टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताने विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. साखळी फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत भारत अजिंक्य राहिला. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका या संघांचा पराभव टीम इंडियाने केला. विश्वचषकाचा अंतिम सामना तर अतिशय अटीतटीचा आणि रोमहर्षक म्हणावा असाच झाला.
टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी
टीम इंडियाची जबरदस्त सांघिक कामगिरी यावेळी दिसून आली. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ३० चेंडूंमध्ये ३० धावा इथवर आपलं लक्ष्य आणून ठेवलं होतं. त्यामुळे हा सामना भारत जिंकेल का? याबाबत क्रिकेट रसिकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र या सामन्यात आणि मालिकेत जसप्रित बुमराहने कमाल केली. त्याचं कौतुक विराट कोहलीने केलं आहे. मुंबईत जो विजयी उत्सव साजरा झाला त्या विजय उत्सवात जसप्रित बुमराह म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे असं विराटने म्हटलं आहे.
हे पण वाचा- आयसीसीच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे नामांकन जाहीर, रोहितला बुमराहसह ‘हा’ खेळाडू देतोय टक्कर, कोण मारणार बाजी?
काय म्हणाला विराट कोहली?
“आज मी अशा व्यक्तीचं कौतुक करतोय ज्याने आम्हाला या खेळात परत आणलं आणि एकदाच नाही तर परत परत जिंकवलं. मी सर्वांना सांगेन की बुमराहसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्ही नशीबवान आहोत की आम्ही त्याच्यासह खेळत आहोत. बुमराहसारखा खेळाडू क्वचितच एखाद्या जनरेशनमध्ये दिसतो.” असं म्हणत विराटने बुमराचं कौतुक केलं.
विराटला यावेळी प्रश्न विचारण्यात आला जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावं का? तू सही करशील का? त्यावर विराट एका क्षणाचाही विलंब न करता म्हणाला होय मी सही करायला तयार आहे कारण बुमराह जगातलं आठवं आश्चर्य आहे.
बुमराह काय म्हणाला?
टी २० विश्वचषक स्पर्धेतील चमकदार कागमरीसाठी जसप्रीत बुमराहला ‘मालिकावीर’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. जसप्रीत बुमराहने आठ सामन्यांत ४.१७ च्या इकोनॉमी रेटने १५ गडी बाद केले होते. मोक्याच्या क्षणी विकेट घेऊन टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर आणलं. त्यामुळे जसप्रीत बुमराहचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने आपल्या निवृत्तीबाबतही जाहीरपणे भाष्य केलं. “माझी निवृत्ती अजून खूप लांब आहे. मी आता कुठे खेळायला सुरुवात केली आहे.”
भारताकडून रोहितच्या सर्वाधिक धावा
भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल बोलायचे तर, २०२४ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान, त्याचे कर्णधारपद उत्कृष्ट होते आणि तो अपराजित राहिला आणि तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील होता. रोहित शर्माने या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यात ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने २५७ धावा केल्या. या विश्वचषकात रोहितची सर्वात संस्मरणीय खेळी कांगारू संघाविरुद्धची सुपर ८ सामन्यात होती, ज्यात त्याने ४१ चेंडूत ९२ धावा केल्या होत्या. त्याने उपांत्य फेरीतही शानदार फलंदाजी केली आणि इंग्लंडविरुद्ध ३९ चेंडूत ५७ धावा केल्या.