तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी चषक जिंकला. जगज्जेत्या भारतीय संघाचे मागच्या दोन दिवसात दिल्ली आणि मुंबईत झालेले स्वागत सर्वांनीच पाहिले. काल बार्बाडोसहून दिल्लीत परतलेल्या भारतीय संघाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली. मोदींनी भारतीय संघाशी तब्बल दीड तास संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी प्रत्येक खेळाडूची भावना जाणून घेतली. तसेच काहींना त्यांनी स्वतःहून प्रश्नही विचारले. अंतिम सामन्यात शेवटची ओव्हर टाकणाऱ्या हार्दिक पंड्याशीही मोदींनी संवाद साधला. त्याचा मागच्या सहा महिन्यातला प्रवास आणि शेवटच्या ओव्हरमधील अनुभव यावर मोदींनी प्रश्न विचारला.

भारताने अंतिम सामन्यात विजय मिळविल्यानंतर आयसीसीच्या समालोचकांशी बोलताना त्याचा मागच्या सहा महिन्यातील संघर्षाचा उल्लेख केला होता. याबाबत मोदींनी विचारले असता हार्दिकने सांगितले की, मागच्या सहा महिन्यात मी चढ-उतार पाहिले. मैदानावर चाहत्यांनी माझी खिल्ली उडवली. त्यामुळे मी नेहमी सांगायचो की, मी माझ्या खेळातूनच उत्तर देईल. मी संघर्ष करत राहिलो. कारण संघर्षातूनच यश मिळते. मला कर्णधार, प्रशिक्षक आणि संघाचे पाठबळ मिळाले. तसेच शेवटच्या ओव्हरमध्ये देवाने साथ दिली आणि माझे भाग्य उजळले.

“तुझी हिंमत कशी झाली?”, कुलदीप यादवला मोदींचा थेट प्रश्न; रोहित शर्माची तक्रार करत गोलंदाजानेही दिलं स्पष्ट उत्तर, पाहा Video

यानंतर शेवटच्या ओव्हरबाबत मोदींनीही आपली उत्सुकता बोलून दाखविली. तुझ्या पहिल्याच चेंडूवर सुर्यकुमारने कॅच पकडली. त्याला तू काय म्हणालास? यावर सर्वांमध्येच हशा पिकला. हार्दिक म्हणाला, सुर्यकुमारने कॅच पकडल्यानंतर आम्ही तर आधी सेलिब्रेशन केलं. त्यानंतर आम्ही सुर्यकुमारकडून खात्री करून घेतली की, बाबा तू कॅच व्यवस्थित पकडलीस ना? त्यावर सुर्यकुमारने व्यवस्थित कॅच पकडल्याचे आम्हाला सांगितले.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुर्यकुमारलाही या कॅचबद्दल विचारले. यावर सुर्यकुमार म्हणाला की, बॉल माझ्यादिशेने येत असताना मला वाटलं नव्हतं की कॅच पकडू शकेन. माझा प्रयत्न होता की, बॉल कसाही करून बाँड्रीच्या आतच अडवायचा. जेणेकरून एक किंवा दोन धावा येतील. पण हवाही जोरदार होती, बॉल माझ्या हातात बसला. मग मी बॉल उडवून पुन्हा झेलला. अशा कॅचेसचा आम्ही सराव केला होता. फलंदाजी तर मी करतोच. पण त्याशिवाय क्षेत्ररक्षणातही वेगळं काही तरी करण्याचा माझा प्रयत्न असतो.

सुर्यकुमारने घेतलेल्या कॅचचाही सराव केला जातो का? असा प्रश्न मोदींनी विचारला. याचे उत्तर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले. सुर्यकुमारने याआधी अशाप्रकारच्या दीडशे कॅच सामन्यात आणि सरावादरम्यान पकडल्याचे सांगितले.