भारतात टीम इंडियाच्या T20 विश्वचषक जिंकण्याचं कौतुक अजूनही सुरुच आहे. पुढचे काही दिवस आणि काही महिने ते सुरुच राहिल याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तो विजयच तितका रोमहर्षक होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना अत्यंत रोमहर्षक म्हणावा असाच पार पडला. टीम इंडियाच्या या विजयानंतर त्यांचं कौतुक होतं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडक खेळाडूंशी फोनवरुन संवाद साधला आणि त्यांचं कौतुक केलं. सोशल मीडियावरही टीम इंडियाने जिंकलेल्या टी २० विश्वचषकाचं प्रचंड कौतुक होतं आहे. अशातच कॅप्टन रोहित शर्माच्या आईने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.
काय म्हटलं आहे रोहित शर्माच्या आईने?
“खांद्यावर लेक, पाठिशी देश आणि शेजारी भाऊ.” असं कॅप्शन देत रोहित शर्मा, विराट कोहली यांचा फोटो रोहितच्या आई पूर्णिमा शर्मांनी पोस्ट केला आहे. इंस्टाग्रामवरचा हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्या पोस्टचीही चांगलीच चर्चा आहे.
हे पण वाचा- VIDEO : एमएस धोनीने कौतुक करताच भारावला रोहित शर्मा; म्हणाला, ‘माही भाई तर…’
आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ च्या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. विराट-रोहित दोघांनी निवृत्ती घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. चाहते या धक्क्यातून सावरत नाहीत, तोवर ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही टी 20 I क्रिकेटला अलविदा केलं आहे.
टीम इंडियावर बक्षीसांचा वर्षाव
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करून जगज्जेतेपद पटकावलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीकडून (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) टीम इंडियाला बक्षीस मिळालं आहेच, त्याचबरोबर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही टीम इंडियासाठी मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
जय शाह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून जगज्जेत्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांच्यासाठी १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करतान आनंद होत असल्याचं वक्तव्य केलं आहे. शाह यांनी म्हटलं आहे की टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत असाधारण कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत त्यांची प्रतिभा आणि दृढनिश्चय दाखवला, त्यांनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं, या अनन्यसाधारण कामगिरीसाठी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन असं म्हणत पोस्ट केली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd