T20 World Cup 2024, IND vs SA Final: शनिवारचा दिवस तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी प्रचंड उत्कंठा, भीती, पराभवाच्या विचारांचं नैराश्य, पुढच्या काही क्षणांत पुन्हा संचारलेला उत्साह आणि या सगळ्या भावनांचा मानबिंदू ठरलेला विश्वविजय अशा असंख्य संमिश्र भावनांचा ठरला. शनिवारी दिवसभर देशातल्या तमाम क्रिकेटप्रेमींमध्ये पराकोटीची उत्सुकता होती तर रात्री सामना संपल्यानंतर आपल्या क्रिकेटपटूंसाठी उरात तितक्याच पराकोटीचा अभिमान, आनंद आणि उत्साह! तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोहित सेनेनं विश्वचषक जिंकून पुन्हा एकदा क्रिकेटच्या दुनियेतलं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या विजयाची आणि त्यानंतरच्या सेलिब्रेशनची दृश्य पाहताना क्रिकेटप्रेमींना २०११ च्या अंतिम सामन्यानंतरच्या सेलिब्रेशनची आठवण झाली नसेल तरच नवल! कारण तेव्हा सचिन होता आणि आत्ता राहुल द्रविड! दोन दिग्गज आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी दिग्गज सलामी.. थेट विश्वचषक!

काल वेगळाच राहुल दिसला!

भारताच्या विश्वविजयी संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याचे भारतासह जगभरात लाखोंच्या संख्येनं चाहते आहेत. त्या सगळ्यांना राहुल द्रविड काय आहे याची पूर्ण कल्पना आहे. किंबहुना त्याच्या त्याच स्वभावावर त्याचे चाहते फिदा आहेत! पण शनिवारच्या विश्वविजयानंतर राहुल द्रविडचा शांत आटोपशीर स्वभाव पार कुठल्याकुठे निघून गेला होता. विश्वचषक हाती आल्यानंतर विराट कोहलीनं तो जवळपास हट्टानंच राहुल द्रविडकडे दिला. कारण अर्थात राहुल द्रविड नेहमीप्रमाणे मागेच होता! पण त्या झळाळच्या विश्वचषकाचा स्पर्श झाला आणि राहुल द्रविडमधला प्रचंड संघर्ष करून आलेला, कारकि‍र्दीचा प्रत्येक क्षण फक्त भारतासाठीच खेळलेला आणि तरीही २००७ च्या विश्वचषकात नामुष्कीजनक पराभवाला सामोरा गेलेला कर्णधार, प्रचंड कष्टाळू खेळाडू आणि अंतिमत: या विश्वविजयी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड त्याची जुनी ओळख पार विसरून त्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला.

पाहा राहुल द्रविडचं सेलिब्रेशन!

विश्वविजेत्याच्या थाटात राहुलनं तो विश्वचषक उंचावला आणि आजूबाजूच्या भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. खुद्द राहुलचा आनंद गगनात मावेना झाला होता. यानंतर भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडला खांद्यावर घेऊन मिरवलं. ही दृश्य एकीकडे क्रिकेटप्रेमी डोळ्यांत साठवून घेत असताना दुसरीकडे २०११ च्या आठवणी पुन्हा एकदा जागृत होत होत्या!

…तेव्हा सचिन होता!

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या नुवान कुलसेखराला समोरच्या बाजूला उत्तुंग षटकार खेचून भारताच्या विश्वविजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा चेहरा भारतीय क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत. त्या सामन्यात खुद्द धोनी सामनावीर तर तब्बल ३६२ धावांचा रतीब घालणारा आणि भारताच्या विश्वविजयाचा हिरो ठरलेला युवराज सिंग मालिकावीर ठरला होता. हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेवटचा वर्ल्डकप होता. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी सचिनला खांद्यावर उचलून घेतलं आणि आख्ख्या मैदानाला फेरी मारली.

विश्वविजेतेपदासह विराट कोहलीचा टी२० ला अलविदा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय म्हणाला?

रोहित शर्मा, विराट कोहली अशी आत्ताच्या संघातली दिग्गज मंडळी तेव्हा ऐन पंचविशीत खेळत होती. पण त्यांचा आपल्या लाडक्या दैवतासाठीचा उत्साह कोणत्याही भारतीय क्रिकेटप्रेमीपेक्षा तसूभरही कमी नव्हता. २०२४ मध्ये भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडला खांद्यावर उचलून घेत असताना २०११ च्या अंतिम सामन्यातल्या अनेक आठवणी यावेळी जागृत झाल्याचं या क्रिकेटप्रेमींनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये नमूद केलं. पण क्रिकेटपटूंच्या खांद्यावरचा सचिन आणि द्रविड या दोन प्रतिमा तमाम क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत!

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid celebration on ind wins 2024 t 20 world cup final against south africa under rohit sharma captaincy pmw