Rahul Dravid’s raw emotions on field after India’s win against SA in T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा सात धावांनी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पण, भारतीय संघाला चॅम्पियन बनविण्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मोठा वाटा होता. संघाचा प्रशिक्षक म्हणून हा त्याचा शेवटचा सामना होता. दरम्यान, विजेतेद जिंकल्यानंतर राहुल द्रविडने अतिशय भावनिक अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘मी खूप भाग्यवान आहे की…’ राहुल द्रविडची भावनिक प्रतिक्रिया

राहुल द्रविड म्हणाला की, एक खेळाडू म्हणून मी विश्वचषक ट्रॉफी जिंकू शकलो नाही; पण प्रशिक्षक म्हणून जिंकलो. मी खूप भाग्यवान आहे की, मला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाली आणि या खेळाडूंमुळे हे शक्य झाले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकून नवा इतिहास रचला. भारताने अशा प्रकारे दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही भारतीय संघाचा निरोप घेतला. दरम्यान, विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड खूपच भावूक दिसला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, एक खेळाडू म्हणून मी विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याइतका भाग्यवान नव्हतो. पण, मी माझे सर्वोत्तम ते दिले. मी भाग्यवान आहे की, मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची संधी मिळाली. मी स्वत:ला खूप लकी मानतो की, या खेळाडूंनी माझ्यासाठी हे केले आणि विश्वचषक ट्रॉफी जिंकली. ही एक जबरदस्त भावना आहे. विश्वचषक जिंकून मला माझी कसर भरून काढायची होती, असे नाही; तर मी माझे कर्तव्य बजावत होतो. हा खूप छान प्रवास होता. सपोर्ट स्टाफ आणि संपूर्ण कोचिंग स्टाफने मिळून उत्तम काम केले.

जय शाहांची इच्छा झाली पूर्ण; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसच्या मैदानात रोवला भारताचा ध्वज; video व्हायरल

दरम्यान, टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारताच्या विजयानंतर आता राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळदेखील संपुष्टात आला आहे. त्याचा करार फक्त टी-२० विश्वचषक २०२४ पर्यंतच होता. २००७ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये राहुल द्रविडला त्याच्या नेतृत्वाखालील विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडावे लागले होते. मात्र, १७ वर्षांनंतर त्याच मातीत प्रशिक्षक म्हणून त्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला.