Ravindra Jadeja Retires from T20Is : विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने टी-२० फॉरमॅटला अलविदा केला आहे. मात्र, रवींद्र जडेजा वनडे आणि कसोटीत खेळत राहणार आहे. शनिवारी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक जिंकला. या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. यासोबतच आता या यादीत रवींद्र जडेजाचेही नाव जोडले गेले आहे. अशा प्रकारे टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर तीन महान भारतीय क्रिकेटपटूंनी या फॉरमॅटला अलविदा केला आहे.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने इन्स्टाग्रामवर टी-२० विश्वचषका २०२४ च्या ट्रॉफीसह फोटो पोस्ट करत ही मोठी घोषणा केली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “माझ्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद! मी टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरला अलविदा म्हणत आहे. अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे मी माझ्या देशासाठी नेहमीच १०० टक्के दिले आहेत आणि देत राहीन. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक जिंकणे हे एक स्वप्न जे आता सत्यात उतरले आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या आठवणी आणि अतुलनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”

२०२४ च्या फायनलमध्ये रवींद्र जडेजाची जादू चालली नाही –

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रवींद्र जडेजाची जादू चालली नाही. त्याने केवळ २ धावा केल्या. गोलंदाजीत त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याचा पदार्पणाचा सामनाही असाच होता. १० फेब्रुवारी २००९ रोजी त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कोलंबोमध्ये झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाला एकही विकेट घेता आली नाही. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना केवळ ५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – ‘क्रिकेटला वेळ दिला नाहीस तर सगळे तुला…’, जेतेपदानंतर रोहितच्या बालपणीच्या कोचने सांगितली जुनी आठवण

कशी होती रवींद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द?

रवींद्र जडेजा पहिल्यांदा टी-२० विश्वचषक २००९ मध्ये खेळला, त्यानंतर तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहिला. या अष्टपैलू खेळाडूने ७४ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये एक फलंदाज म्हणून त्याने २१.४६ च्या सरासरीने आणि १२७.१६ च्या स्ट्राईक रेटने ५१५ धावा केल्या. त्याच वेळी, रवींद्र जडेजाने भारतासाठी गोलंदाज म्हणून टी-२० सामन्यांमध्ये ७.६२ इकॉनॉमी आणि २९.८५ च्या सरासरीने ५४ बळी घेतले. टीू-२० क्रिकेटमध्ये ४६ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली.