सध्या सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्यामुळे त्याचे सगळेच चाहते झाले आहेत. सूर्यकुमार उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून प्रत्येक संघाविरुद्ध धावा करत आहे. अलीकडेच आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत सूर्यकुमार पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकत त्याने आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. सुर्याच्या या कामगिरीबद्दल ऋषभ पंतने त्याला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋषभ पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव उभा आहे आणि ऋषभ पंत त्याच्या शेजारी उभा आहे आणि त्याच्याकडे बोट दाखवून तो नंबर १ असल्याचे सांगत आहे. पंत सूर्यकुमार यादवकडे बोट दाखवत असताना, सूर्यकुमार डोळे झाकून स्वॅग दाखवतो, तर व्हिडिओमध्ये दुसऱ्या बाजूला #1 लिहिले आहे. सूर्यकुमार यादवचे आयसीसीचा नंबर १ टी-२० फलंदाज बनल्याबद्दल सर्वजण त्याचे अभिनंदन करत आहेत. बीसीसीआयनेही सूर्यकुमार यादवचे अभिनंदन केले असून, त्यावर सूर्यकुमार यादवने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर भारताने आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने भारताने जिंकले आहेत. भारताला फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पण या सामन्यातही सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावले होते. या चारही सामन्यांमध्ये ऋषभ पंतला अद्याप संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. संघात त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे. ६ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, असे मानले जात आहे.