Rishabh Pant showcased his exceptional wicketkeeping skills in the T20 World Cup 2024 semifinal : गयाना येथे गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमाल दाखवली. या सामन्यात टीम इंडिया खूपच संयमित दिसत होती. संघाच्या खेळाडूंनी प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी केली. या सामन्यातील ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. धोनीचा शिष्य असलेल्या ऋषभ पंतमध्ये पण माहीच्या कौशल्याची चमक दिसत आहे. या व्हिडीओतील ऋषभ पंतच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला अशा प्रकारे यष्टिचित केले की ब्रिटीशही चक्रावून गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आठव्या षटकात मोईन अलीला केले यष्टिचित –

आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हे दृश्य दिसले. सुरुवातीपासूनच अडचणीत सापडलेल्या इंग्लिश संघाला सांभाळण्यासाठी मोईन अली तिसऱ्या क्रमांकावर आला होता. ९ चेंडूत ८ धावा केल्यानंतर तो खेळत होता. दरम्यान त्यावेळी अक्षर पटेल गोलंदाजी करायला आला. जेव्हा त्याने पहिला चेंडू टाकला या चेंडूवर मोईन अलीने पुढे जाऊन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चतुर अक्षर पटेल त्याला चकवा दिला. त्यामुळे चेंडू मोईनच्या पॅडला लागला आणि विकेटजवळ गेला.

ऋषभ पंतच्या चपळाईने जिंकली चाहत्यांची मनं –

दरम्यान, ऋषभ पंतने चपळाई दाखवत ताबडतोब चेंडू उचलला आणि स्टंपवरील बेल्स उडवल्या. मोईन परत येण्यापूर्वीच पंतने त्याला मोठा धक्का देत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंतचे हे शानदार क्षेत्ररक्षण पाहून कर्णधार रोहित शर्माही खूश झाला. त्याने पंतच्या पाठीवर थाप दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पंतचा एक झेल सुटला होता. ज्यावर रोहित शर्मा खूप संतापलेला दिसत होता. मात्र, आता तो त्यांच्यासोबत खूप खूश दिसत होता. मात्र, या सामन्यात ऋषभ पंतची बॅट चालली नाही. अवघ्या ४ धावा करून तो बाद झाला, पण त्याची भरपाई त्याने क्षेत्ररक्षणात केली.

हेही वाचा – IND vs ENG Semifinal : राहुल द्रविडने निराश विराटला दिला धीर, सांत्वन करतानाचा VIDEO व्हायरल

रोहित शर्माच्या शानदार खेळीनंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता शनिवारी विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने १० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने याआधी २०१४ मध्ये टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना तिसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी २००७ आणि २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने २००७ मध्ये जेतेपद पटकावले होते, तर २०१४ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा – IND vs ENG : रोहित शर्माने रचला इतिहास! धोनी-बाबरला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच कर्णधार

कर्णधार रोहित शर्माच्या ३९ चेंडूत ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने १९ धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने २३ धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे भारतीय संघाने १० वर्षानंतर अंतिम फेरीत धडक मारली. आता शनिवारी संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते आणि आता विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pants lightning fast stumping sends moeen ali back to pavilion in semi final t20 world cup 2024 video viral vbm