India vs Zimbabwe T20I Series: टी-२० वर्ल्डकपनंतर लगेचच भारत वि झिम्बाब्वेमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यासारख्या वरिष्ठ खेळाडूंनी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
भारताच्या तीन दिग्गज खेळाडूंनंतर एक तरुण भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. रियान पराग, अभिषेक शर्मा यांची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे. टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाल्यानंतर रियान पराग इतका उत्साही होता की तो आपला पासपोर्ट आणि मोबाईल फोन विसरला. बीसीसीआयने याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांनी टीम इंडियासोबत प्रवास करतानाचा अनुभव शेअर केला आहे.
बीसीसीआय टीव्हीवर रियान पराग म्हणाला, “भारतीय संघासोबत अशाप्रकारे प्रवास करणं हे लहानपणापासून माझं स्वप्न होतं. क्रिकेट तर आम्ही सगळेच खेळतो, पण भारतीय संघासोबत प्रवास करणे, भारताची जर्सी घालणं, या गोष्टीही येतात. मी इतका उत्साहित होतो की मी माझा पासपोर्ट आणि मोबाईल फोन विसरलो, विसरलो म्हणजे मी कुठेतरी भलतीकडेच ठेवले. पण आता पासपोर्ट मोबाईल दोन्ही मिळाले.”
रियान पुढे म्हणाला, “अनेक नवीन चेहरे आहेत, पण माझ्यासाठी जुनेच आहेत, कारण आम्ही एकत्र खूप खेळलो आहोत. आसाममधील एक लहान मुलगा ज्याने लहानपणापासून भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले, जेव्हा ते सत्यात उतरले तेव्हा मला खूप आनंद झाला. झिम्बाब्वेसोबत एक स्पेशल कनेक्शन असणार आहे. जेव्हा मी कोणत्याही मैदानावर माझा पहिला सामना खेळतो तेव्हा त्या मैदानासाठी आणि माझ्यासाठी एक खास क्षण असतो. पण हे एक सीक्रेट असणार आहे. टीम इंडियाला ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान झिम्बाब्वेमध्ये पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.”
Travel Day ✅
— BCCI (@BCCI) July 3, 2024
The Journey Begins… ?
Excitement, happiness & more, ft. #TeamIndia newcomers ?#ZIMvIND | @ParagRiyan | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/YdhK5jldtW
भारतीय संघ बुधवारी पहाटे झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला. या संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार असून तो थेट अमेरिकेवरून झिम्बाब्वेला पोहोचणार आहे. संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल टी-२० वर्ल्डकप संघासोबत असल्याने हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघासोबत जोडले जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या दोन टी-२० सामन्यासाठी संघात बदल केले आहे. यशस्वी, शिवम, संजू सॅमसन त्यांच्या जागी हर्षित राणा, साई सुदर्शन आणि जितेश शर्मा यांना बोलावण्यात आले. तर या मालिकेतील सर्व सामने हरारे येथे होणार आहेत.