Rohit Sharma Retires from T20Is: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. भारताने शनिवारी (२९ जून) बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ जिंकत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. यासह कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. याआधी विराट कोहलीने फायनलमध्ये सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर निवृत्ती घेतली होती.
कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२००७ आणि २०११) नंतर – ३७ वर्षीय रोहित शर्मा हा टी-२० विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. भारतीय कर्णधार आता जिंकलेल्या ५० टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विश्वचषक अंतिम सामना हा त्याच्या कारकिर्दीतील ५वा विजय आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात संघाकडून अप्रतिम कामगिरी केल्यानंतर रोहितने टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत एकही सामना न गमावता टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. यामुळे ११ वर्षांनी आयसीसीची ट्रॉफी जिंकत भारताने दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्मा हा २००७ च्या पहिल्या विश्वचषक जेतेपद पटकावलेल्या संघाचाही भाग होता आणि आता त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने हे जेतेपद पटकावले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली पाठोपाठ टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद जिंकताच रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटला अलविदा केलं आहे. पत्रकार परिषदेत रोहित शर्माने निवृत्तीची माहिती दिली. निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्मा म्हणाला, “हा माझा शेवटचा सामना आहे. या फॉरमॅटला अलविदा करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. या फॉरमॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे. मी या फॉरमॅटमध्ये खेळून भारतासाठी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि मला हेच हवे होते. मला हा विश्वचषक जिंकायचा होता.”
What A Moment & What A Win to reach The Landmark! ? ?
— BCCI (@BCCI) June 29, 2024
Captain Rohit Sharma! ? ? #T20IWorldCup | #TeamIndia | #SAvIND | @ImRo45 pic.twitter.com/i3hLTuXZpt
After Virat Kohli, Indian skipper Rohit Sharma announces retirement from T20 International Cricket pic.twitter.com/MlfUtNNBgW
— ANI (@ANI) June 29, 2024
भारताने ११ वर्षानंतर आयसीसी टूर्नामेंट जिंकल्यानंतर भावूक झालेला रोहित म्हणाला, “मी पूर्णपणे हरवून गेलो आहे आणि मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाहीय. शब्दात व्यक्त करता येत नाही. काल रात्री, मला झोपही येत नव्हती कारण मी हताश होतो आणि ट्रॉफी मिळवण्याची वाट पाहत होतो. पण मी मैदानात स्वतःला चांगल्याप्रकारे सावरले.”