Rohit Sharma Clean Bowled By PM Narendra Modi Video: टी २० विश्वचषकात विजयी पताका झळकवल्यावर टीम इंडिया ४ जुलैला मायदेशी परतली. भारतात आल्यापासूनच टीम इंडियाच्या शिलेदारांवर चहुबाजूने कौतुकाचा, प्रेमाचा वर्षाव होत आहे. मुंबईत काल रोहित शर्माच्या मेन इन ब्लुला पाहण्यासाठी चाहत्यांचा महासागर उसळला होता. तर दिल्ली विमानतळावर सुद्धा चाहत्यांनी टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्या, पंड्यासह अनेक खेळाडू जसं शक्य होईल त्या पद्धतीने चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते हे सोशल मीडियावरील वेगवेगळ्या व्हिडीओजमधून पाहायला मिळतंय. चाहत्यांची भेट घेण्याआधी काल टीम इंडियाच्या खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शाह, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी यावेळी रोहित शर्माला प्रश्न विचारताना तू नेहमीच इतका गंभीर (सिरिअस) असतोस का असा सवाल केला. या प्रश्नाचा मूळ संदर्भ काय होता? एरवी सामन्यांमध्ये हसत खेळत दिसणाऱ्या रोहितला पंतप्रधानांनी असा प्रश्न का केला? याचं उत्तर आता आपण जाणून घेऊया..
तर झालं असं की, मोदींनी रोहितशी बोलण्याची सुरुवात करताना त्याला विचारलं की, “तू २००७ मध्ये जेव्हा भारतीय संघ विश्वचषक जिंकला तेव्हा संघातील सर्वात तरुण खेळाडू होतास आणि आता २०२४ मध्ये तू विजयी संघाचा कर्णधार आहेस, तर हा अनुभव कसा होता?” यावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, “खरं सांगायचं तर, जेव्हा मी पहिल्यांदा संघात आलो तेव्हा लगेचच आमचा आयर्लंड दौरा होता त्यावेळेस राहुल भाई कर्णधार होते. मी आयर्लंडला संघासह गेलो आणि मग तिथून विश्वचषकासाठी आम्ही दक्षिण आफ्रिकेला पोहोचलो. तिथे आम्ही विश्वचषक जिंकला तेव्हा खूप छान वाटलं पण नंतर जेव्हा ट्रॉफी घेऊन मुंबईत आलो आम्हाला विमानतळावरून वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचायलाच जवळपास पाच तास लागले. तेव्हा दोन-तीन दिवसांनी मला हेच वाटत होतं की अरे विश्वचषक जिंकणं तर सोपं आहे पण परीक्षा त्यानंतरच सुरु होते.”
मागील कालावधीत अनुभवलेल्या पराभवांविषयीसुद्धा रोहितने भाष्य केले. तो म्हणाला की, “२००७ नंतर अनेक विश्वचषक झाले. आम्ही काही वेळा अगदी विजयाच्या जवळ पोहोचलो पण काही कारणाने यश मिळायचं नाही. यावेळच्या (२०२४) विश्वचषकाच्या बाबत एक गोष्ट मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की यावेळी सगळ्यांमध्ये जिंकण्याची भूक होती. न्यूयॉर्कमध्ये यंदा मॅच होणार होत्या जिथे कधीच क्रिकेटचे सामने झाले नव्हते, त्यामुळे अर्थात खूप अडचणी आल्या, सरावासाठी पीचही धड नव्हतं पण कधीच कुणी तक्रार केली नाही प्रत्येकाचं एकच लक्ष्य होतं की बार्बाडोसमध्ये आपण फायनल कशी खेळायची आहे. अशा संघाचं नेतृत्व करताना खूप छान वाटतं कारण इथे प्रत्येकाचं ध्येय एकच आहे. आता जेव्हा आम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहतो, लोक रात्रभर हातात भारताचा तिरंगा घेऊन रस्त्यावर फिरताना पाहतो तेव्हा खूप छान वाटतं. आम्हा सर्व खेळाडूंचं हेच उद्दिष्ट्य आहे की येणाऱ्या पिढीसाठी कशी प्रेरणा देता येईल. जेव्हा राहुल भाई, तेंडुलकर, लक्ष्मण हे खेळायचे त्यांना बघून आम्ही खेळायला लागलो आता आम्हाला बघून इतरांनाही तेच प्रोत्साहन मिळावं हे ध्येय आहे. मला वाटतं की यंदाच्या विश्वचषकाने त्यासाठी खूप मदत केलीये.”
Video: रोहित शर्मा व मोदींमधील गप्पा
हे ही वाचा << “तुझी हिंमत कशी झाली?”, कुलदीप यादवला मोदींचा थेट प्रश्न; रोहित शर्माची तक्रार करत गोलंदाजानेही दिलं स्पष्ट उत्तर, पाहा Video
दरम्यान, संपूर्ण संभाषणाच्या वेळी रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्याचं बोलणं संपताच मोदींनी लगेचच भारतीय सलामीवीराला गुगली टाकत विचारले की, “तू नेहमीच इतका गंभीर असतोस का?” ज्यावर रोहितने हसून सर हे तुम्ही मुलांनाच विचारा असं उत्तर दिलं.