Rohit Sharma IND vs ENG Match Updates: टी-२० विश्वचषक २०२४ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड संघांमध्ये गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावत भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच रोहित शर्माने एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. भारतीय कर्णधारांच्या खास यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले आहे.

इंग्लंडविरूद्धच्या उपांत्य फेरीतील सामना ८ षटकांनंतर पावसामुळे थांबवण्यात आला आहे. भारताने ८ षटकांत २ बाद ६५ धावा केल्या आहेत. तत्त्पूर्वी टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये २ विकेट्स गमावले. विराट कोहली ९ धावा तर ऋषभ पंत ४ धावा करत बाद झाले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मात्र आपल्या फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावा करून आपला दबदबा निर्माण करणारा रोहित इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने आतापर्यंत २६ चेंडूत ६ चौकार मारत ३७ धावा केल्या आहेत. यासह त्याने मोठी कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IND v ENG: “डोकं वापरणंही गरजेचं…”, इंझमाम उल हकच्या बॉल टेंपरिंगच्या आरोपावर रोहित शर्मा वैतागला, म्हणाला; “आम्ही काय…”

रोहित शर्माने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो भारताच्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत रोहित पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव अग्रस्थानी आहे. कोहलीने भारतीय कर्णधार म्हणून १२,८८३ धावा केल्या आहेत. तर एमएस धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने ११,२०७ धावा केल्या. मोहम्मद अझरुद्दीन ८०९५ धावांसह तिसऱ्या स्थानावर तर सौरव गांगुली ७६४३ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. आता या यादीत रोहित शर्माचेही नाव जोडले गेले आहे.

हेही वाचा – IND v ENG: “बुमराह माझ्यापेक्षा १००० पटीने…”, सेमीफायनलपूर्वी कपिल देवचं मोठं वक्तव्य, म्हणाले; “आमच्याकडे अनुभव होता”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे कर्णधार


१२,८८३ धावा – विराट कोहली
११,२०७ धावा – एमएस धोनी
८०९५ धावा – मोहम्मद अझरुद्दीन
७६४३ धावा – सौरव गांगुली
५०१३* धावा – रोहित शर्मा

हेही वाचा – IND vs ENG: रोहित-बटलरच्या आकडेवारीत भलताच योगायोग, दोन फलंदाजांची अशी आकडेवारी याआधी कधीच पाहिली नसेल!

रोहित शर्माने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही केला आहे. या यादीत त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. महेला जयवर्धनेने टी-२० विश्वचषकात १११ चौकार मारले होते. पण रोहित शर्मा आता त्याच्याही पुढे गेला आहे.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
रोहित शर्मा – ११३
महेला जयवर्धने – १११
विराट कोहली – १०५
डेव्हिड वॉर्नर – १०३