Kapil Dev Trolled For Virat vs Rohit Comment Video: भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ झाली आहे. एकीकडे भारतीय संघ आज इंग्लंडच्या विरुद्ध टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत उतरणार असताना कपिल देव यांनी भारतीय संघाचे दोन तगडे शिलेदार रोहित शर्मा व विराट कोहली यांची तुलना करून नेटकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे. रोहित शर्माचं कौतुक करताना त्यांनी विराटवर केलेली टीका ही नेटकऱ्यांना भावलेली नाही. आता कुठे भारतीय संघ एकत्रितपणे उपांत्य फेरीत पोहोचलाय अशावेळी प्रोत्साहन देण्याऐवजी विराट विरुद्ध रोहित हा वाद उकरून संघातच फूट पाडण्याची काही गरज नाही असेही नेटकऱ्यांनी कपिल देव यांना सुनावले आहे. हे तुमचं नेहमीचंच आहे. पण नेमकं असं माजी कर्णधार बोलून तरी काय गेले? चला जाणून घेऊया..
भारताच्या व्यावसायिक गोल्फ टूरच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या कपिल यांनी बुधवारी माजी सलामीवीर आकाश चोप्रा व पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांच्यासह एबीपी न्यूजच्या एका शोमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याविषयीच्या चर्चेत सहभाग घेतला होता. इथे कपिल देव म्हणाले की, ” रोहित शर्मा हा विराट कोहलीसारखा उड्या मारत नाही, त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत व त्या जाणूनच तो सर्वोत्तम कामगिरी करतो. या बाबतीत रोहितापेक्षा उत्तम कुणीच नाही, अगदी विराटही नाही.”
१९८३ चे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी रोहितच्या कर्णधारपदी केलेल्या कामगिरीचे सुद्धा विशेष कौतुक केले. कपिल देव म्हणतात की, “असे अनेक महान खेळाडू आहेत जे स्वतःसाठी खेळतात, स्वतःसाठी कर्णधारपद स्वीकारतात. पण रोहित शर्मा हा त्यांच्यापैकी एक नाही. तो संपूर्ण टीमला आनंदी ठेवतो.” नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कपिल देव यांनी हे विधान करून अप्रत्यक्षपणे विराट व रोहितच्या कर्णधारपदी केलेल्या कामगिरीची तुलनाच केली आहे. ज्यात रोहितला वरचढ दाखवताना त्यांनी विराटला सुनावण्याच्या प्रयत्न केला आहे. या आशयाच्या अनेक कॅप्शन कमेंट्ससह कपिल देव यांचा खालील व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.
हे ही वाचा<< “विराट कोहली १५० किलोचे डंबेल उचलतो, पण रोहित शर्माचा एक पॅक..”, कपिल देव यांचं मोठं विधान; म्हणाले, “मर्यादांची..”
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हे ही वाचा<< टीम इंडिया ‘या’ भीतीने विश्वचषकात दुबळी पडतेय? रोहित शर्माचा IND vs ENG मॅचआधी खुलासा, फिरकीपटूंविषयी म्हणाला…
टी २० विश्वचषकाच्या सुपर आठ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूत ९२ धावा करून इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत प्रवेश करताना रोहित शर्मा हा संघासाठी तारणहार ठरला होता. पण दुसरीकडे, रोहितचा सलामीचा जोडीदार कोहली आयपीएलनंतर आता फॉर्मसाठी झगडत आहे. कोहलीने आतापर्यंत सहा डावात केवळ ६६ धावा केल्या आहेत. २०२२ T20 विश्वचषकात भारताला १० विकेट्सने हरवून इंग्लंडने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली होती. आज त्याच पराभवाचा बदला घेताना विराट कोहली व रोहित शर्मा हे दोन्ही हुकुमी एक्के चालणे महत्त्वाचे आहे.