Rohit Sharma : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत जगज्जेतेपद पटकावलं. यासह भारतीय संघाने १० वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने विराट कोहलीच्या ५९ चेंडूतील ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकांमध्ये ६ गड्यांच्या बदल्यात १७६ धावा जमवल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांमध्ये ८ गड्यांच्या बदल्यात १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला.

या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरला. भारताने २००७ साली पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर गेल्या १७ वर्षांपासून भारत या चषकासाठी संघर्ष करत होता. तसेच २०११ साली क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत गेल्या ११ वर्षांपासून आयसीसी चषकाच्या प्रतीक्षेत होता. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १० वर्षांपासूनचा दुष्काळ संपवून आयसीसी चषक उंचावला.

दरम्यान, या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांच्या आसवांचा बांध फुटला होता. या विजयानंतर रोहित शर्माने भारताचा तिरंगा ध्वज मैदानात रोवून जल्लोष केला. त्याच्याबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि उपकर्णधार हार्दिक पांड्यादेखील होते.

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा बीसीसीआयचे सचिव जय शाह एका कार्यक्रमात म्हणाले होते की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बार्बाडोसमध्ये भारताचा तिरंगा फडकावेल. भारताने विश्वचषक विजयासह जय शाह यांचं आश्वासन पूर्ण केलं. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि जय शाह या तिघांनी मिळून बार्बाडोसच्या मैदानावर तिरंगा फडकावला.

हे ही वाचा >> दक्षिण आफ्रिका अंतिम सामना जिंकू शकली असती, पण शेवटच्या पाच षटकांत सामना फिरला; नेमकं काय घडलं?

जसप्रीत बुमराहला भावना अनावर

यावेळी जसप्रीत बुमराहच्या डोळ्यांतही आनंदाश्री तरळले होते. बुमराह म्हणाला की, मी सहसा माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि शांत राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आज माझ्याकडे बोलायला फारसे शब्द नाहीत, मी खेळानंतर सहसा रडत नाही. परंतु कधीकधी भावना अनावर होतात. आज तशीच स्थिती निर्माण झाली आहे.