Rohit Sharma Mother Showers Kisses on Son: टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी आणि संघासोबत हा मोठा क्षण साजरा करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी झाली होती. पाऊस आणि तुफान गर्दी असूनही या विश्वविजेत्या संघाला पाहण्यासाठी चाहते मरीन ड्राईव्हवर वाट पाहत होते. या विजयी परेडनंतर संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला, तिथे संघाचं जोरदार स्वागत झालं आणि एक कार्यक्रम पार पडला. या स्टेडिमयवरील कार्यक्रमाच्या वेळेचा रोहित शर्मा आणि त्याच्या आईचा एक भावुक करणारा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी रोहित शर्माचे संपूर्ण कुटुंबही त्यात सहभागी होण्यासाठी आले होते. त्याची आई पूर्णिमा शर्मा, वडील गुरुनाथ शर्मा आणि भाऊ विशाल या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळेस रोहित आपल्या पालकांना भेटण्यासाठी वानखेडे स्टेडियमच्या प्रेसिडेंट बॉक्समध्ये पोहोचला.

रोहित शर्मा त्याच्या आईला भेटला तेव्हा तो खूप भावनिक क्षण होता. आईने रोहितला पाहताच त्याच्या आईने त्याला मायेने कुरवाळलं. लहान बाळाला जवळ घेतल्यानंतर ज्याप्रमाणे आई त्या बाळाचे लाड करते त्याप्रमाणेच रोहितच्या आईने लेकाचे पटापट मुके घेतले. वारंवार त्या लेकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होत्या. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला आणि आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर सर्वांच्या मनात स्थान करणारा रोहित शर्मा आईसमोर लहान बाळचं झाला होता.

हेही वाचा – “हार्दिक….हार्दिक….”, ज्या वानखेडेवर हिणवलं त्याच मैदानावर नावाचा जयघोष; हार्दिक पांड्या म्हणाला…

रोहित शर्माच्या आईचे वर्ल्डकप विजयावर वक्तव्य

रोहित शर्माची आईला काल ४ जुलै रोजी डॉक्टरकडे जायचे होते, तशी अपॉईंटमेंटही होती. पण लेकाला पाहण्यासाठी त्याची आई वानखेडे मैदानावर हजर होती. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पूर्णिमा शर्मा म्हणाल्या, “मी कधीच विचार केला नव्हता की मी हा दिवस पाहीन. विश्वचषक खेळण्यासाठी जाण्यापूर्वी तो आम्हाला भेटायला आला आणि म्हणाला की यानंतर मला टी-२० सोडायचं आहे. मी फक्त इतकंच सांगितलं की जिंकण्यासाठी प्रयत्न करा. आज माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी डॉक्टरांकडेही जाणार होती, पण तरीही मी इथे आली कारण मला हा आजचा दिवस पाहायचा होता.”

“मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाहीय. लोक किती चिअर करतायत, असं वातावरण मी कधीच अनुभवलं नव्हतं. त्याला जेवढे प्रेम मिळत आहे ते त्याच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे. मी आज सर्वात आनंदी आई आहे. ” पुढे सांगताना रोहित शर्माची आई म्हणाली.

हेही वाचा – Team India: रोहित शर्माचा पंजाबी ढोलच्या तालावर भांगडा, सूर्यकुमारने घातली फुगडी, VIDEO व्हायरल

स्टेडियममध्ये रोहित शर्माने टीम इंडियाच्या खेळाडूंचे वर्ल्डकपमधील भूमिकेबद्दल कौतुक केले. त्याने विजयात हार्दिक पंड्याच्या योगदानाचा उल्लेख केला. समारंभ संपल्यानंतर संपूर्ण टीम इंडियाने स्टेडियममध्ये फिरून चाहत्यांचे आभार मानले. रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण संघाचा वानखेडेवर डान्स करतानाचा व्हीडिओ खूपच व्हायरल झाला होता.