IND vs ENG Rohit Sharma Press Conference: २०२४ च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध भारत असा सामना पाहायला मिळणार आहे. २०२२ ला उपांत्य फेरीत भारत व इंग्लंड आमनेसामने आले होते व तेव्हा भारतीय संघाला हार पत्करून माघारी यावे लागले होते. इंग्लंडने १० विकेट्सने भारताला हरवून अत्यंत लाजिरवाणा पराभव टीम इंडियाला अनुभवायला लावला होता. यंदा भारताला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. २०२४ च्या विश्वचषकात भारत व दक्षिण आफ्रिका हे दोनच संघ अपराजित राहिले आहेत. भारत आज इंग्लंडच्या विरुद्ध रात्री ८ वाजता मैदानात उतरणार आहे. सामन्याच्या अगोदर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याबाबतची एकच भीती बोलून दाखवली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंडसाठी राखीव दिवस नाही!

गुयानाच्या जॉर्जटाउन येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीसाठी कोणताही राखीव दिवस नसेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला शहरात पावसाने हजेरी लावली आहे. त्रिनिदादमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे कारण सामना मुळात २६ जुलै रोजी होत आहे. पण स्थानिक वेळेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी भारताचा सामना होणार असल्याने राखीव दिवस ठेवलेला नाही. रोहित म्हणाला की, “मला आशा आहे की पूर्ण सामना होईल, भारत परिस्थितीनुसार जुळवून घेण्यास तयार आहे.”

रोहितने सांगितलं भीतीचं कारण

रोहितने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितले की, “परिस्थिती कोणाच्याही नियंत्रणात नाही, काय होणार आहे हे कुणालाच माहित नाही. मला फक्त एकच काळजी वाटते की जर खेळ उशीरापर्यंत चालला तर आमची चार्टर्ड फ्लाइटची वेळ चुकू शकते. पण ठीक आहे, आम्हाला पुढच्या ठिकाणी पोहोचवणे ही आयसीसी आणि क्रिकेट वेस्ट इंडिजची डोकेदुखी आहे. आम्ही हा खेळ चांगला कसा खेळू शकतो आणि निकाल आमच्या बाजूने कसा वळवू शकतो यावर आम्ही लक्ष केंद्रित करू. दोन चांगले संघ खेळणार आहेत त्यामुळे हा खेळ मुळात चांगला होणार आहे.”

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरने सांगितली भारत जिंकण्याची दोन मुख्य कारणं; रोहित शर्मा, अक्षर पटेल, बुमराहसाठी केलेली पोस्ट ठरतेय लक्षवेधी

भारताला मिळालेला ‘हा’ फायदा अन्यायकारक? रोहितचं उत्तर काय?

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना, उपांत्य फेरीत पोहोचल्यास आपण गयानामध्ये खेळणार आहोत हे त्यांना माहीत असल्यामुळे भारताला अन्यायकारक फायदा झाल्याचा दावाही रोहितने फेटाळून लावला. भारतीय कर्णधाराने सांगितले की, इंग्लंडलाही भारतीय खेळाडूंप्रमाणेच वेस्ट इंडीज देशातील परिस्थिती माहित आहे. रोहित म्हणाला की, “मला वाटत नाही की त्याचा फायदा आहे. यापैकी बरेच खेळाडू वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी खेळले आहेत. मला खात्री आहे की येथे अनेक इंग्लिश क्रिकेटपटू खेळले आहेत. त्यामुळे दिवसअखेरीस तुम्हाला जिंकण्यासाठी चांगले क्रिकेट खेळावे लागेल, अन्य गोष्टींचा मला फायदा वाटत नाही.”