T20 World Cup 2024, India Won Against Pakistan: भारताने टी-२० विश्वचषकातील आणखी एका सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आणि आपला उत्कृष्ट विक्रम कायम राखला. विराट कोहलीने २०२२ च्या टी-२० वर्ल्डकप सामन्यात जसा पराक्रम केला तसंच काहीसं या यंदाच्या विश्वचषक सामन्यात बुमराहने केलं. भारताची विजयाची शक्यता फारच कमी होती. पण हार मानेल तो भारतीय संघ कसला. रोहित शर्माच्या संघाने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. या निर्णायक क्षणी कर्णधार रोहित शर्माने संघाचे मनोबल कायम राखले आणि खेळात टिकून राहण्यासाठी प्रेरित केले. पाकिस्तानविरूद्धच्या विजयानंतर रोहित शर्माने मैदानात घडलेला प्रसंग सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या विजयाची केवळ २ टक्के शक्यता असल्याचे मोठ्या पडद्यावर दिसत होते, परंतु असे असतानाही भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य अजिबात डगमगलेले दिसले नाही. आपले मनोबल कायम राखत आपल्या कामगिरीवर लक्ष्य साधत संघाने हा अनपेक्षित विजय मिळवला. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने सर्व खेळाडूंना एकत्र करून प्रेरित केले. याचा खुलासा स्वतः कर्णधाराने सामन्यानंतर केला.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

रोहित शर्मा सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला, “खरे सांगायचे तर, गेल्या सामन्याच्या तुलनेत या खेळपट्टी चांगली होती. अशा बॉलिंग लाइन-अप सोबत खेळताना तुमचाही आत्मविश्वास वाढतो. पाकिस्तानचा डाव सुरू असताना आम्ही सगळे एकत्र जमा झालो आणि सांगितले की हे आपल्यासोबत जर असं (भारतीय संघ ३ बाद ८० धावांवर खेळत असताना त्यांच्या गोलंदाजीसमोर काही वेळातच ११९ धावांवर ऑल आऊट झाला.) होऊ शकतं तसंच त्यांच्यासोबतही घडू शकतो. तेही विकेट्स गमावू शकतात. प्रत्येकाचं थोडेसं जास्तीचं योगदान खूप मोठा बदल घडवू शकतो.”

रोहित शर्मा आणि संघाच्या या रणनितीसह भारतीय संघाने १५ व्या षटकापासून पाकिस्तानवर असा काही दबाव बनवला की संघाला एकही बाऊंड्री लगावण्याची संधी दिली नाही. बुमराहने पहिल्याच चेंडूवर मोहम्मद रिजवानला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानच्या आशा संपुष्टात आणल्या. यानंतर भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी करत बुमराहला साथ दिली. बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल

बुमराहच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “बुमराह काय करू शकतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. संपूर्ण विश्वचषकात तो याच मानसिकतेने खेळावा असावा अशी माझी इच्छा आहे. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”

कर्णधार रोहित शर्माने न्यूयॉर्कमध्ये सामन्यासाठी उपस्थित असलेल्या भारतीय चाहत्यांचे आभार मानले. ही फक्त सुरुवात असल्याचे आश्वासनही त्याने सर्वांना दिले आहे. कर्णधार म्हणाला, “गर्दी विलक्षण होती. आम्ही कुठेही कसेही खेळत असो ते कधीही निराश करत नाहीत. मला खात्री आहे की ते हसतमुखाने घरी जातील. ही फक्त सुरुवात आहे, आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma statement after india historic win over pakistan said that if it can happen to us it can happen to them ind vs pak t20 world cup 2024 bdg