ICC T20 World Cup 2024 USA vs IND Updates: अर्शदीप सिंगची भेदक आणि विक्रमी गोलंदाजी आणि सुर्यकुमार यादवचे संयमी अर्धशतक यासह भारताने अमेरिकेवर ७ विकेट्सने विजय मिळवला. भारताने टी-२० विश्वचषकातील सलग ३ सामन्यांमध्ये विजय मिळवत विजयाची हॅटट्रिक साधली आहे. हॅटट्रिकचं नाही तर या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या सुपर८ फेरीतही धडक मारली आहे. अमेरिकेने शानदार गोलंदाजी करत भारताच्या धावांवर अंकुश ठेवला पण ३ विकेट्स गमावल्यानंतर मैदानात सेट झालेल्या शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादवने संधी मिळताच मोठे फटके लगावले आणि भारताला विजय मिळवून दिला. याचसोबत अमेरिकेला पेनल्टी बसलेल्या ५ धावाही भारताला मिळाल्या ज्याचा संघाला विजयात फायदा झाला. रोहित शर्माने भारताच्या विजयानंतर नेमके काय वक्तव्य केले जाणून घ्या.
भारताने विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मानेही सांगितले की हा विजय मिळवणं सोपं नव्हतं, पण सूर्यकुमार आणि शिवम दुबेच्या फलंदाजीला त्याने श्रेय दिले. त्याचबरोबर रोहितने अमेरिकेच्या ताफ्यातील भारतीय खेळाडूंचेही कौतुक केले.
भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
भारताच्या अमेरिकेवरील विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, “हा विजय मिळवणं अजिबातचं सोपं नव्हतं, पण याचे श्रेय संघाला जाते, ज्याप्रकारे आम्ही संयम राखला आणि महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मॅच्युरिटी दाखवत संघाला विजयापर्यंत नेण्याचे श्रेय सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेला जाते.”
सामन्यानंतर बोलताना पुढे रवी शास्त्रींनी रोहितला म्हटले की या सामन्यात बोरिवलीचे अनेक खेळाडू खेळत होते. अमेरिकेतील भारतीय क्रिकेटपटूंबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “यापैकी बऱ्याच जणांसोबत एकत्र क्रिकेट खेळलो आहे, त्यांची प्रगती पाहून खूप आनंद झाला. त्यांना गेल्या वर्षीही एमएलसीमध्ये (मेजर क्रिकेट लीग) पाहिले, ते सगळे कष्टाळू आहेत.”
हेही वाचा – रोहित-विराटची ड्रीम विकेट घेणारा सौरभ नेत्रावळकर आहे तरी कोण? वाचा मराठमोळ्या क्रिकेटपटूची कहाणी
भारताच्या गोलंदाजांबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला माहित होते की गोलंदाजांनी पुढे येऊन चांगली कामगिरी केली पाहिजे कारण धावा काढणे कठीण होते. सर्व गोलंदाजांनी आपले काम चोख केले, विशेषतः अर्शदीपने.” पुढे दुबेच्या गोलंदाजीवर म्हणाला, गोलंदाजीमध्ये पर्याय हवे आहेत आणि आम्हाला ते जेव्हा जमतील तसे वापरता आले पाहिजेत. आज, खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली म्हणून दुबेचा गोलंदाजीसाठी उपयोग करून घ्यायचा होता.”
Rohit Sharma said "I am happy to see the progress of the USA players, they are so hardworking, we saw them in MLC last year". pic.twitter.com/Tkp2WQh5ub
— Johns. (@CricCrazyJohns) June 12, 2024
हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द
भारतीय संघ सुपर८ मध्ये पोहोचल्याबद्दल रोहित शर्माने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला, “हा मोठा दिलासा आहे, इथे क्रिकेट खेळणं सोपं नव्हतं. आम्हाला तिन्ही सामन्यांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहावे लागले. या विजयामधून खूप आत्मविश्वास मिळेल. सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, त्याने दाखवून दिले की त्याच्याकडे एक वेगवेगळ्या पध्दतीने खेळण्याचे कसब आहे, अनुभवी खेळाडूंकडून तुम्हाला हीच अपेक्षा असते. आजच्या सामन्याला शेवटपर्यंत नेण्यासाठी आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो ज्या मार्गाने टिकून राहिला याचे श्रेय त्याला जाते.” भारताला आता गट टप्प्यातील पुढील कॅनडाविरूद्धचा सामना १५ जूनला खेळायचा आहे. जो डलास येथे होणार आहे.