भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२४ मधील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयर्लंडविरूद्धचा हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याच मैदानात भारताचा बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर ६० धावांनी मोठा विजय साकारला. पण या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा थोडा वैतागलेला दिसला.
बांगलादेशविरूद्धचा सराव सामना सुरू असताना एक चाहता सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देत रोहित शर्माला भेटण्यासाठी थेट मैदानात पोहोचला. हे पाहताच या मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली आणि त्याला पकडले. पण सुरक्षा रक्षकांनी ज्याप्रकारे त्याला पकडले हे पाहून रोहितला वाईट वाटलं आणि त्यांने काळजीपूर्वक त्याला बाहेर घेऊन जा, असे सांगितना दिसला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. आता या घटनेबाबतच रोहित शर्माला एक प्रश्न विचारण्यात आला, या उत्तरात तो म्हणाला.
हेही वाचा – T20 WC 2024: “मी अजून काही बोलू शकणार नाही”… कोच राहुल द्रविड यांच्याबद्दल बोलताना रोहित शर्मा झाला भावुक
रोहित म्हणाला- “सर्वात आधी मी म्हणेन की असं मैदानात कोणीही अचानक धावत येऊ नये. हे योग्य नाही आणि हा प्रश्नही योग्य नव्हता. कारण अशा गोष्टी प्रमोट करायच्या नाहीत की कोण मैदानात धावत आलंय.”
खेळाडू आणि चाहत्यांच्याही सुरक्षेबाबत सांगताना रोहित म्हणाला, “खेळाडूंची सुरक्षितता महत्त्वाची आहेच पण त्याचप्रमाणे बाहेरील लोकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. आपण क्रिकेट खेळतो. पण चाहत्यांनाही प्रत्येक देशाचे काही नियम असतात ते समजून घेत त्यांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. इतकं छान स्टेडियम त्यांनी बनवलं आहे, बाहेर बसून छान सामना पाहण्याचा आनंद घेता येऊ शकतो. मला वाटतं मैदानावर असं धावत येण्याची गरज नाही, हे सगळं करण्याची गरज नाही.”
याविषयी बोलताना रोहितला विचारलं गेलं की या घटनांमुळे खेळाडूंचं लक्ष विचलित होत का? यावर रोहित म्हणाला – “नाही, नाही, लक्ष विचलित होण्याचा प्रश्नच नाही. यामुळे कोणत्याही खेळाडूचे लक्ष विचलित होईल, असे मला वाटत नाही. कारण त्यांच्या मनात अनेक मोठ्या गोष्टी सुरू असतात. सामना कसा जिंकायचा, धावा कशा करायच्या, विकेट कसे काढायचे. मला खात्री आहे की प्रत्येकजण हाच विचार करत असेल.”