Rohit Sharma Statement on Super 8 Matches: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर८ फेरीच्या सामन्यांना १९ जूनपासून सुरूवात होणार आहे. भारतासहित सर्वच संघांना सुपर८ फेरीत ३ सामने खेळायचे आहेत. सुपर८ मधील सर्व सामने हे वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघाच्या तयारीबद्दल आणि खेळाडूंबद्दल माहिती दिली. तसेच सुपर८ मधील धावपळीच्या वेळापत्रकाबद्दलही त्याने भाष्य केले. ज्याचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
गट टप्प्यातील सामने संपले असून ८ संघांमध्ये सुपर एट फेरी रंगणार आहे. २० संघांपैकी अव्वल ८ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या २० संघांची प्रत्येकी पाच संघांच्या चार गटात विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येक गटातील टॉप-२ संघ सुपर८ मध्ये पोहोचले आहेत. सुपर८ फेरीसाठी दोन गट असून प्रत्येक गटात चार संघ आहेत. दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर
सुपर८ च्या वेळापत्रकाबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?
टीम इंडियाने १२ जूनला शेवटचा सामना खेळला होता. तर १५ जूनला होणारा भारत वि कॅनडा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर भारताचा सुपर८ मधील सामना थेट २० तारखेला खेळवला जाणार आहे. भारतीय संघ एका एका दिवसाच्या फरकाने तिन्ही सामने खेळणार आहे, यासाठी संघाचा कडक सराव सुरू आहे.
बीसीसीआय टीव्हीने टीम इंडियाच्या सराव सत्राचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने संघाच्या तयारीबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे. रोहित शर्मा म्हणाला, ‘संघातील प्रत्येकाला मैदानावर काहीतरी खास कामगिरी करून दाखवण्याची उत्सुकता आहे. आम्ही आमच्या कौशल्यांवर शक्य तितके लक्ष केंद्रित करत आहोत, एक संघ म्हणून प्रत्येक सत्र खूप महत्वाचे आहे. आम्ही ४ दिवसांत ३ सामने खेळणार आहोत. आमचं वेळापत्रक खूपच धावपळीचं आहे, परंतु आम्हाला याची सवय आहे. आम्ही खूप प्रवास करतो आणि बरेच सामनेही खेळतो, त्यामुळे हे निमित्त असू शकत नाही.”
पुढे सांगताना रोहित शर्मा म्हणाला, “एक संघ म्हणून आम्ही कशी कामगिरी करू यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही इथे बरेचदा सामना खेळले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला माहित आहे की त्यांची भूमिका काय असणार आहे. प्रत्येकजण सुपर८ फेरीसाठी उत्सुक आहे आणि त्याच वेळी उत्साही पण आहे,” असे रोहित म्हणाला.
टीम इंडियाला सुपर८ फेरीत मध्ये २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध, २२ जूनला बांगलादेशविरुद्ध आणि त्यानंतर २४ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने खेळायचे आहेत. जर भारत सुपर-8 मध्ये टॉप २ मध्ये राहिला तर तो उपांत्य फेरीत प्रवेश करेल. याचसोबत भारताचे तिन्ही सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघाचं सुपर८ फेरीचं वेळापत्रक
२० जून – भारत वि अफगाणिस्तान – बार्बाडोस – रात्री ८ वाजता
२२ जून – भारत वि बांगलादेश – अँटिगा – रात्री ८ वाजता
२४ जून – भारत वि ऑस्ट्रेलिया – सेंट लुसिया – रात्री ८ वाजता