IND vs ENG T20 World Cup Semi Finals: भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्याआधी बुधवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या इंझमामला सुनावण्यापासून ते ऑस्ट्रेलिया खेळातून बाहेर पडण्यापर्यंत वेगवगेळ्या मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. पण याच परिषदेत ‘भारताला वाटत असणाऱ्या भीती’बाबत रोहितला प्रश्न केल्यावर त्याने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. रोहित शर्माने भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याचा दबाव खूप जास्त असल्याचे म्हणत संघाला उपांत्य फेरीत कसं शांत राहून गोष्टी सोप्या करता येतील याकडे लक्ष देत असल्याचे सांगितले. यापूर्वी भारतीय संघ २०२२ च्या ऍडलेड ओव्हल येथील विश्वचषकात उपांत्य फेरीत १० विकेट्सने इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला होता. भूतकाळातील या अपयशामुळे मनात असलेल्या भीतीचा सामना करावा लागत आहे हे सुद्धा रोहितने मान्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IND vs ENG: भारताच्या मनात भीती?

जगज्जेता संघ होण्याच्या शर्यतीत भारताला यापूर्वी आलेल्या अपयशामुळे किंवा दुर्दैवामुळे मनात भीती आहे आणि त्यामुळे संघाची बाजू दुबळी पडत आहे का?असे विचारले असता, रोहितने “या दोन्ही गोष्टी काही प्रमाणात खऱ्या आहेत” असे म्हटले. भारतीय कर्णधार पुढे म्हणाला की, “आम्हाला हा सामना एक सामान्य खेळ म्हणून खेळायचा आहे. सेमी फायनलच्या दृष्टीने आम्ही याविषयी बोलू इच्छितच नाही. आम्ही एकत्र खेळण्याचा आनंद घेत आहोत आणि तसाच विचार आम्हाला कायम ठेवायचा आहे. कारण जर याला नॉकआउट सामना म्हणून पाहिलं तर खूप अनावश्यक विचार मनात येत राहणार आणि दबाव आणखी वाढणार.”

टीम इंडियाचा मूलमंत्र काय? रोहित शर्मा सांगतो..

गुरुवारी गुयेना येथे होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघातील सहकाऱ्यांनी स्मार्ट क्रिकेट खेळावे अशी अपेक्षा सुद्धा रोहितने बोलून दाखवली आहे. तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे २०२२ पासून खूप काही बदललेले नाही. टी २० असो किंवा एकदिवसीय सामने आम्ही मनमोकळेपणाने खेळण्याचा प्रयत्न केला आहे, संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत असलेल्या आव्हानात्मक परिस्थितीवर आता सर्व काही अवलंबून आहे. आम्हाला एक स्मार्ट क्रिकेट संघ म्हणून खेळायचे आहे. मी वैयक्तिकरित्या आणि खेळाडूंसाठी गोष्टी सोप्या ठेवल्या आहेत. प्रत्येकाला त्याची भूमिका स्पष्टपणे माहित आहे त्यामुळे मैदानावर चांगले निर्णय घेणाऱ्या खेळाडूंवर आम्ही अवलंबून आहोत. प्रत्येकाला माहित आहे की त्यांना काय काम करणे आवश्यक आहे. आम्हाला २०२२ ते २०२४ हा बदल करण्याची गरज वाटत नाही.”

भारतीय संघ नेहमीच दबावात..

रोहितने सुपर आठ टप्प्यातील महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूत ९२ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. कर्णधार म्हणाला की गेल्या काही वर्षांपासून मैदानात शांत डोक्याने खेळणे ही गोष्ट त्याच्यासाठी काम करतेय. “थंड आणि शांत राहणे महत्त्वाचे आहे. शांत राहणे माझ्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. काहीवेळा तुम्ही शांतता गमावू शकता. त्यामुळे खेळाडूंना जे हवं ते करू देण्यात मला आनंद वाटतो अर्थात पण त्याची किंमत संघाला मोजावी लागणार असेल तर मी ते घडू देणार नाही. भारतीय संघ हा तसाही नेहमीच दबावात असतो आणि जवळपास सर्वच खेळाडूंना याची सवय आहे.”

हे ही वाचा<< IND vs ENG: रोहित शर्माच्या मनात एकच चिंता; T20 WC सेमीफायनलआधी स्वतः म्हणाला, “सामना उशिरापर्यंत चालला तर..”

IND vs ENG प्लेइंग ११ चं गणित..

दरम्यान, आजच्या सामन्यातील प्लेइंग ११ विषयी प्रश्न केला असता रोहितने उत्तर देणे टाळले. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी वेस्ट इंडिज-लेग ऑफ टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कॅरिबियन मधील विकेट्स फिरकी गोलंदाजीला मदत करत आहेत पण संघात चार फिरकीपटूंना स्थान मिळेल का याविषयी परिस्थितीचे मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल असे रोहितने सांगितले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma straight answer about team india fears of loosing ahead of semi final ind vs eng indian playing xi spinners t20 world cup match updates svs