Ritika Sajdeh Emotional Post For Rohit Sharma on T20I Retirement: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवून टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. ट्रॉफी मिळवण्यासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न करत असलेल्या कर्णधाराला आणि भारतीय संघाला अखेरीस यश आले. भारताने शनिवारी (२९ जून) बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. या विजयानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने टी-२० मधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यानंतर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने एक भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२००७ आणि २०११) नंतर – ३७ वर्षीय रोहित शर्मा भारतासाठी विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. मात्र, या विश्वचषकानंतर विराट कोहलीसोबत रोहित शर्मानेही टी-२० क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानेही सोशल मीडियावर पोस्ट करत टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.
रोहित शर्माच्या पत्नीने केलेली ही पोस्ट पाहून सर्वच जण भावुक झाले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रितिकाने लिहिलंय, “रोहित, मला माहित आहे की ही ट्रॉफी तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. हा फॉरमॅट, हा चषक, हे खेळाडू, हा प्रवास आणि ती ट्रॉफी मिळवण्याचा संपूर्ण प्रक्रिया तू नेहमीच हे स्वप्न पाहिले आहेस. मला माहित आहे की गेले काही महिने तुझ्यासाठी किती कठीण गेले आहेत. तुझ्या मनावर आणि शरीरावर याचा किती परिणाम झाला हे मला माहीत आहे, पण तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना पाहणं खूप भावुक करणारं आणि प्रेरणादायी आहे.”
हेही वाचा – Team India: वर्ल्डचॅम्पियन भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला, ‘या’ कारणामुळे मायदेशी परतण्यास होतोय उशीर
रोहितच्या निवृत्तीबद्दल रितिका म्हणते, “तुझी पत्नी या नात्याने, तू जे काही साध्य केलं आहेस आणि या खेळावर आणि या खेळावर प्रेम करणाऱ्या सर्वांवरच तुझा असलेला प्रभाव याचा मला खूप अभिमान आहे; पण तुला खेळताना पाहून आनंद मिळणारी एक व्यक्ती म्हणून या खेळाचा एक भाग मागे सोडताना तुला पाहताना वाईट वाटतं आहे. मला माहित आहे की हा निर्णय घेण्यापूर्वी तू या संघासाठी सर्वोत्तम काय आहे याचा खूप विचार केला असशील, पण तरीही तुला या फॉरमॅटपासून दूर जाताना पाहणं अवघड असणार आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुला माझे म्हणवून घेण्याचा मला अभिमान आहे!”
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर सर्वाधिक ७६ धावा केल्याने विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यानंतर विराटने टी-२० मधून निवृत्त असल्याचे जाहीर केले. तर त्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने टी-२० मधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत रवींद्र जडेजानेही टी-२० मधून निवृत्त होत असल्याचे सांगितले.