IND vs SA, T20 World Cup Finals Update: भारतीय क्रिकेट संघ शनिवारी, २९ जूनला टी २० विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आठ महिन्यांनंतर दुसरा विश्वचषक अंतिम सामना, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. १९ नोव्हेंबरला २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. विद्यमान विश्वचषकाप्रमाणे त्याही वर्षी भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला होता, पण फायनल्समध्ये मोक्याच्या क्षणी भारताने सामना व चषक गमावला. आता T20 विश्वचषकाच्या २०२४ च्या अंतिम फेरीत प्रोटीज संघाचा सामना करताना आयसीसी विजेतेपदाच्या दुष्काळाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याची आणखी एक संधी भारताला मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा मी अध्यक्ष होतो, विराटला कर्णधारपदी राहायचं नव्हतं.. काय म्हणाला सौरव गांगुली?

पीटीआयशी बोलताना, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जर आज भारत हरला तर रोहित शर्माची प्रतिक्रिया कशी असेल याविषयी भाष्य केलं आहे. गांगुली म्हणाला की, “भारत आजही फायनलमध्ये हरल्यास रोहित बार्बाडोसच्या महासागरात उडी घेईल. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. त्याच्या उत्तम नेतृत्वाचं आणि कर्णधारपदी केलेल्या कमाल कामगिरीचं हे उदाहरण आहे. जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो आणि विराट कोहलीला कर्णधार राहायचं नव्हतं तेव्हा रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, मला तेव्हाही आश्चर्य वाटलं नव्हतं कारण रोहितवर मला विश्वास होता. उलट रोहितच कर्णधार होण्यासाठी तयार नव्हता त्याला तयार करण्यासाठी मध्ये खूप वेळही गेला, पण आता जेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रगती करतोय हे पाहून तेव्हा केलेले प्रयत्न सार्थकी लागले असे वाटतेय.”

आयपीएल जिंकणं खूप कठीण..

पुढे, गांगुली असंही म्हणाला की स्पर्धेच्या कालावधीमुळे आयपीएल विजेतेपद जिंकणे कधीकधी अधिक आव्हानात्मक असू शकते. “रोहितच्या नावावर पाच वेळा आयपीएल जेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे. ही अर्थातच मोठी कामगिरी आहे. मला चुकीचं समजू नका, मी असं म्हणत नाही की आयपीएल हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगले आहे पण काही वेळा सलग होणारे सामने व स्पर्धेचा कालावधी लक्षात घेता आयपीएल जिंकणे अधिक कठीण असू शकते. तुम्हाला आयपीएल जिंकण्यासाठी १६- १७ (१२ -१३ ) सामने जिंकावे लागतात तर विश्वचषक जिंकण्यासाठी ८- ९ सामने जिंकावे लागतात. विश्वचषक जिंकणे हा अधिक मोठा सन्मान आहे, आणि मला आशा आहे की रोहितला यंदा तो सन्मान भारताला मिळवून देता येईल.”

..तर रोहित समुद्रात उडीच घेईल!

गांगुलीने टीमला आजच्या फायनलसाठी शुभेच्छा देत म्हटलं की, “रोहित शर्मा हा सात (सहा) महिन्यांच्या कालावधीत दोन विश्वचषक फायनल्स हातातून निसटू देईल असा कर्णधार वाटत नाही. तरीही जर भारत हरलाच तर मला वाटतं रोहितच बार्बाडोसच्या समुद्रात उडी घेईल. या वेळेस त्याने टीमचं नेतृत्व कुशलतेने केलं आहे. स्वतः उत्तम फलंदाजी केली आहे. मला आशा आहे की उद्या भारत तिन्ही बाजूंनी उत्तम खेळेल. त्यांनी जिंकावं यासाठी त्यांना खूप शुभेच्छा, त्यांना थोडी नशिबानेही साथ द्यायला हवी कारण असे सामने खेळण्यासाठी ते सुद्धा आवश्यक असतेच. “

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma will jump in barbados ocean if ind vs sa results goes opposite saurav ganguli cheeky remark t20 world cup highlights svs