USA bowler accuses Haris Rauf about ball tampering : पाकिस्तान क्रिकेट संघाला २०२४ च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाची खूप खिल्ली उडवली जात आहे. आता या सामन्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या एका वेगवान गोलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या खेळाडूने या गोलंदाजावर हा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हारिस रौफवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप –

पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील सामन्यानंतर अमेरिकेचा दिग्गज क्रिकेटर रस्टी थेरॉनने वेगवान गोलंदाज हारिस रौफवर चेंडूशी छेडछाड (बॉल टॅम्परिंग) केल्याचा आरोप केला आहे. रस्टी थेरॉनने याबाबत एक्सवर एक पोस्टही केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहले की, हरिस रौफने आपल्या नखाने चेंडू स्क्रॅच केला होता. कारण दोन षटकांपूर्वी बदललेला नवीन चेंडू रिवर्स करणे सोपे नाही. पुढे, त्याने आयसीसीला टॅग केले आणि लिहिले, आपण फक्त दिखावा करणार आहात का? यानंतरही अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला.

पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर ठरला खलनायक –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अमेरिकेला १६० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ १५९ धावाच करु शकला. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला अर्थात टाय झाला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये १९ धावांचे लक्ष्य दिले. ज्यानंतर पाकिस्तानला १३ धावाच करता आल्या. अशा प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हर्समध्ये ५ धावांनी पराभव केला. सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये विकेट काढल्याने अमेरिकेचा विजय सोपा झाला. या सगळ्यानंतर पाकिस्तान संघाचे चाहते पराभवाचे खापर सुपर ओव्हर टाकणाऱ्या मोहम्मद आमिरवर फोडत आहेत. कारण त्याने या सुपर ओव्हरमध्ये ३ वाइडसह १८ धावा खर्च केल्या.

हेही वाचा – IND vs PAK : विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

पुढच्या सामन्यात पाकिस्तानसमोर भारताचे आव्हान –

पाकिस्तान संघाला आता पुढील सामना भारतीय संघाविरुद्ध खेळायचा आहे, जो न्यूयॉर्कच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर आता सुपर ८ चा मार्ग पाकिस्तानसाठी खूपच कठीण झाला आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक असेल. २०२१ साली खेळल्या गेलेल्या विश्वचषकात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. अशा प्रकारे टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानला भारताला फक्त एकदाच पराभूत करण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढचा सामना पाकिस्तानसाठी आणखीनच अवघड असणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rusty theron accuses haris rauf of ball tampering during us vs pakistan match in t20 world cup 2024 vbm