Sachin Tendulkar Post For Rohit Sharma: टीम इंडियाने सोमवारी ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी पराभूत करण्यासाठी दडपणाखाली सुद्धा अत्यंत शानदार कामगिरी केली. रोहित शर्मा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल यांच्या बळावर उपांत्य फेरीसाठी पात्र होत टी २० विश्वचषकातील आपली अपराजित घोडदौड भारताने कायम ठेवली.केवळ ४१ चेंडूंत शानदार ९२ धावा करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडकुंडीला आणत भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा कालच्या सामन्याचा स्टार ठरला. जोश हेझलवुडने विराट कोहलीला शून्यावर बाद केल्याने भारताला सुरुवातीलाचा धक्का बसला पण पुढे रोहितच्या झंझावाती खेळीने सामन्याचा वेगच बदलला.
पुढच्याच षटकात, रोहितने मिचेल स्टार्कचा सामना करताना दणदणीत २८ धावा (एकूण २९, वाइडसह) करत जगज्जेत्या ऑसी संघाला हादरवून सोडलं. एकाच ओव्हरमध्ये चार षटकार ठोकत रोहितने आपला वेग वाढवला आणि संपूर्ण डावात सात चौकार आणि आठ उत्तुंग षटकार मारले. अवघ्या १९ चेंडूंत त्याने हाफ सेन्चुरी पूर्ण केली होती. रोहितच्या तुफानी खेळीच्या वेळी, भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरही थक्क झाला होता. टीम इंडियाच्या कर्णधाराचा ‘खास पण सहज’ असा खेळ पाहून सचिनने एक खास पोस्ट सुद्धा केली आहे.
सचिन तेंडुलकरने लिहिले की, “@ImRo45 ची फलंदाजी पाहणे हा निव्वळ आनंददायी अनुभव होता. तो चांगल्या पोझिशनमध्ये आला आणि त्याच्या सहज बॅट स्विंग केली. वेळेचं गणितही परफेक्ट साधल्यामुळे त्याला मोठी धावसंख्या गाठता आली. खरोखरच ही एक खास खेळी होती.”
दरम्यान, टी 20 विश्वचषकात भारताच्या सलग सहाव्या विजयाला समर्पित अशी एक खास पोस्ट सुद्धा सचिन तेंडुलकरने केली आहे. मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडची विकेट हे या सामन्यातील दोन महत्त्वपूर्ण क्षण होते. यासाठी सचिनने जसप्रीत बुमराह व अक्षर पटेलला टॅग करून त्यांचेही विशेष कौतुक केले .
सचिनने लिहिले की, “शाब्बास, भारत! आजचे दोन महत्त्वाचे क्षण आपल्या विजयाची कहाणी ठरले अक्षर पटेलने सीमारेषेवर घेतलेला शानदार झेल आणि जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडची घेतलेली विकेट यामुळे आपण विजयी होऊ शकलो. आता उपांत्य फेरीची अजून वाट पाहू शकत नाही!”
दरम्यान, टी २० विश्वचषकात भारताने दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी २००७ मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजयी चषकावर आपले नाव कोरले होते. पाहायला गेल्यास डिसेंबर २०२३ पासून भारताने सलग १० टी २० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सर्वोत्तम धावांच्या रेकॉर्ड्समध्ये सुद्धा भारताचा रँक दुसरा आहे. एकीकडे भारताने आता ऑस्ट्रेलियाला बाद करून उपांत्य फेरी गाठली आहे तर अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करून ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेतून बाहेर काढले आहे.
हे ही वाचा<< ‘अक्षर’शः अशक्य विकेट! IND vs AUS सामन्यात अक्षर पटेलने उडी मारून एका हाताने घेतलेला झेल पाहाच, म्हणूनच भारत जिंकला!
आता भारताचा पुढील सामना गतविजेत्या इंग्लंडशी २७ जून रोजी गयाना येथे उपांत्य फेरीत होईल. २०२२ च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला होता, यंदा या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारताकडे उत्तम संधी आहे. यंदा , भारत आणि इंग्लंडने टी-२० विश्वचषकातील चार सामन्यांतून प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत.