Saurabh Netravalkar took revenge for 14 years : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये गुरुवारी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोठा अपसेट दिसून आला. या सामन्यात अमेरिकने २००९ च्या टी-२० विश्वचषक चॅम्पियन टीम पाकिस्तानचा पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला, ज्यामध्ये युनायटेड अमेरिका संघाने पाकिस्तानवर ५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अमेरिका संघाच्या या विजयात भारतीय वंशाचा खेळाडू नेत्रावळकरने मोलाची भूमिका निभावली. त्याचबरोबर १४ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची किमया केली आहे.

सौरभ नेत्रावळकरची कामगिरीने भारतीय चाहत्यांना आनंद –

सौरभ नेत्रावळकरची पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यातील कामगिरी पाहून भारतीय चाहते खूश झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात सौरभ नेत्रावळकरने मोठी भूमिका बजावली, ज्याने अवघ्या ४ षटकांत १३ धावा देऊन २ बळी घेतले. यानंतर सौरभ नेत्रावळकरने अमेरिकेसाठी सुपर ओव्हर टाकून पाकिस्तानला १३/१ धावांपर्यंत रोखून आपल्या संघाला ५ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. आता चाहते सौरभ नेत्रावलकरचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

सौरभ नेत्रावळकरने पाकिस्तानकडून १४ वर्षांचा जुना बदला घेतला –

अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर देखील २०१० चा अंडर-१९ विश्वचषक भारताकडून खेळला आहे. २३ जानेवारी २०१० रोजी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा २ गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात भारताकडून सौरभ नेत्रावळकर खेळला होता. सौरभ नेत्रावलकरने २०१० च्या अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतासाठी ५ षटकात १६ धावा देऊन १ बळी घेतला होता. सौरभ नेत्रावळकर भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देऊ शकला नव्हता.

हेही वाचा – USA vs PAK : ‘भूख लगी थी इसलिए अंडा बना दिया…’, पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला भोपळाही फोडता न आल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

सौरभ नेत्रावळकरने जुना हिशोब केला चुकता –

सौरभ नेत्रावळकरने आता पाकिस्तानकडून १४ वर्षांचा जुना बदला घेतला आहे. सौरभ नेत्रावळकरने अमेरिकेकडून खेळताना पाकिस्तानला हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असली, तरी त्याच्या या कामगिरीने भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सौरभ नेत्रावळकरने २०१० अंडर-१९ विश्वचषकादरम्यान केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि संदीप शर्मा यांसारख्या भारतीय खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले आहे. सौरभ नेत्रावळकरने २०१० अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या होत्या.