अमेरिकेत चालू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेच्या संघाने शानदार विजय मिळवत इतिहास रचला. त्याआधी या संघाने कॅनडावर मात केली. त्यापाठोपाठ भारताच्या बलाढ्य संघाची दाणादाण उडवली. अमेरिकेला भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी अमेरिकेने दिलेलं ११२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघाला १९ व्या षटकापर्यंत संघर्ष करायला लावला. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अमेरिकन संघाच्या या यशाचा शिल्पकार ठरला तो सौरभ नेत्रावळकर. हा क्रिकेटपटू मुळचा मुंबईचा असून तो सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. सौरभ हा एक मध्यमगती गोलंदाज असून तो अमेरिकेला जाण्यापूर्वी भारतातल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये सौरभने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन बळी घेतले. तसेच सुपर ओव्हरमध्ये त्याने ९ धावा देऊन एक बळी घेतला. तसेच अमेरिकेला विजय मिळवून दिला. भारताविरुद्धच्या सामन्यात सौरभने वैयक्तिक पहिल्या दोन षटकांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करून भारताला बॅकफूटवर ढकललं होतं. सौरभच्या या कामगिरीमुळे जगभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आहे.

सौरभ हा शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि त्यानंतर तिकडेच स्थायिक झाला. तो आयटी इंजिनिअर आहेत. तसेच त्याने २०१० च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यावेळी तो केएल राहुल, हर्षल पटेलसारख्या खेळाडूंबरोबर खेळला होता. यानंतर तो मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेतही खेळला आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला सौरभ आता थेट अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा हुकुमी एक्का ठरला आहे.

सौरभचं क्रिकेट कौशल्य सर्वांनी पाहिलं आहे, त्याचबरोबर त्याने आयटी इंजिनिअर म्हणून यशस्वी कारकिर्द घडवली आहे. यासरह त्याच्यातला आणखी एक गुण लोकांना पाहायला मिळाला आहे. सौरभला गाण्याची आवड असून त्याला युकुलेले (गिटारचा एक प्रकार) वाजवायला आवडतं. सौरभने काही मराठी गाणी गाऊन त्याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओंवर आता कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे. क्रिकेटरसिकांबरोबरच मराठी कलावंत आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने या व्हिडीओंवर कमेंट करत सौरभचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. सौरभची तीन-तीन कौशल्ये पाहून अनेकांनी त्याला प्रश्न विचारला आहे की, असं काय आहे जे तुला येत नाही?

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saurabh netravalkar share singing video instagram netzens get crazy asc