USA vs PAK Highlights, T20 World Cup 2024: आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ च्या या स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी विजय मिळवला. अमेरिकेने पाकिस्तानला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये १९ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला एक विकेट गमावून अवघ्या १३ धावाच करता आल्या. अमेरिकेने अशा पद्धतीने या स्पर्धेतला दुसरा सामना जिंकला. अमेरिकेच्या विजयानंतर सोशल मीडियावर त्यांचं अभिनंदन केलं जातं आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओ पोस्ट करत पाकिस्तानची लाज काढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुपर ओव्हरचा थरार कसा होता?

अमेरिकेने दिलेल्या १९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानच्या टीममधले इफ्तिखास अहमद आणि फखर जमान हे दोघेही मैदानात आले. तर अमेरिकेने मराठमोळा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरला सुपर ओव्हरची बॉलिंग दिली. सौरभने पहिला बॉल डॉट टाकला. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. सौरभने त्यानंतर वाईड बॉल टाकला. पाकिस्तानला हे वाटत होतं की त्यांच्या धावा होतील. पण सौरभने तिसरा बॉल फेकला तेव्हा इफ्तिकार अहमदचा कॅच नितीश कुमारने सहज घेतला. नितीशने अप्रतिम झेल घेतल्याने इफ्तिकार आऊट झाला. ज्यानंतर शादाब खान मैदानात आला.

हे पण वाचा- USA vs PAK: बाबर आझमने पाकिस्तानच्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं?

शादाब खान आल्यानंतर काय घडलं?

शादाब खान मैदानात आल्यानंतर पाकिस्तानला ३ चेंडूंमध्ये १४ धावांची गरज होती. सौरभने आणखी एक वाईड टाकल्याने ती १३ धावा विजयासाठी हव्या होत्या. अशातच सौरभच्या चौथ्या चेंडूवर पाकिस्तानने चौकार लगावला. ज्यानंतर २ चेंडूंमध्ये ९ धावा हव्या होत्या. सौरभने पाचव्या चेंडूवर दोन धावा दिल्या. ज्यानंतर एका चेंडूत पाकिस्तानला ७ धावांची गरज होती. सौरभने शेवटचा चेंडू सगळं कौशल्य पणाला लावत फेकला आणि अवघी एक धाव दिली. ज्यानंतर अमेरिकेने इतिहास रचला.

शोएब अख्तरने व्हिडीओत काय म्हटलं आहे?

पाकिस्तानचा पराभव अत्यंत निराशाजनक आहे. अमेरिकेने हरवल्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धेत आमची सुरुवात काही चांगली झाली नाही. पाकिस्तानने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. असाच पराभव १९९९ मध्ये बांगलादेशाच्या विरोधातही झाला होता. पाकिस्तान कधी विजयाचा दावेदारच नव्हता. पाकिस्तानविरोधात अमेरिकेने उत्तम खेळ केला. ते कमांडिग पवित्र्यात राहिले. शाहीन, आमिर यांनी प्रयत्न केला पण काहीही होऊ शकलं नाही. असं म्हणत शोएबने अक्षरशः पराभूत झालेल्या पाकिस्तानची लाज काढली आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar statement after usa defeated pakistan post video scj
First published on: 07-06-2024 at 10:32 IST