आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. परंतु आता आयसीसीकडून दोन भारतीय खेळाडूंना प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी नामांकन मिळाले आहे. आयसीसीने शुक्रवारी ९ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. जे टूर्नामेंटचे सर्वोत्तम खेळाडू बनू शकतात. या यादीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांनाही स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचबरोबर पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय इंग्लंडच्या तीन, झिम्बाब्वे आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला या यादीत स्थान मिळाले आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यानंतरच या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे नाव घोषित केले जाईल.

९ सदस्यीय समितीने २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे ९ खेळाडूंची निवड केली आहे. आता चाहत्यांना या ९ खेळाडूंना मतदान करायचे आहे. ज्या खेळाडूला सर्वाधिक मते मिळतील त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली जाईल.

प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी या ९ खेळाडूंना मिळाले नामांकन –

१.या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे, ज्याने पाच अर्धशतकांच्या जोरावर सहा डावात २९६ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने १३६.४० च्या स्ट्राइक रेटने आणि ९८.६६ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. विराटने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी खेळली होती.

२. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने सहा सामन्यांत १८९.६८ च्या स्ट्राइक रेटने २३९ धावा केल्या. यादरम्यान सूर्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. सूर्या यावेळी आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे.

३. शादाब खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शादाबने पाकिस्तानसाठी बॅट आणि बॉल या दोन्हीद्वारे दमदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानच्या करो या मरोच्या सामन्यात शादाबने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. तसेच गोलंदाजी करताना त्याने अंतिम सामन्यापूर्वी १० विकेट्स घेतल्या आहेत. शादाबचा इकॉनॉमी रेट ६.५९ आहे.

४. या यादीत शाहीन शाह आफ्रिदीचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाची सुरुवात चांगली झाली नाही, पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये विकेट रहित राहिल्यानंतर आफ्रिदीने अंतिम सामन्यापूर्वी एकूण १० विकेट घेतल्या आहेत.

५. सॅम करण या मेगा स्पर्धेत इंग्लंडसाठी एक्स फॅक्टर ठरला आहे. डेथ ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी अप्रतिम होती. सॅम करनने १० विकेट घेतल्या असून अंतिम फेरीतही त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल.

६. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने पाच सामन्यांत १९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४३.१६ राहिला आहे. या स्पर्धेत बटलरचे दोन अर्धशतक झळकावले आहे. ज्यामध्ये भारताविरुद्धच्या नाबाद ८० धावांचा समावेश आहे.

७. इंग्लंडसाठी अॅलेक्स हेल्सने ज्या प्रकारे पुनरागमन केले, ते विलक्षण आहे. हेल्स या स्पर्धेत इंग्लंडकडून आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हेल्सने १४८.५९ च्या स्ट्राईक रेटने एकूण २११ धावा केल्या आहेत.

८. सिकंदर राजाने अष्टपैलू म्हणून चांगली कामगिरी केली. झिम्बाब्वेला सुपर-१२ मध्ये नेण्यात आणि त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यात या खेळाडूचा मोलाचा वाटा होता. सिकंदरने आठ सामन्यांत २१९ धावा केल्या आहेत आणि एकूण १० विकेट्सही घेतल्या आहेत.

हेही वाचा – T20 World Cup 2022: भारताच्या पराभवानंतर दानिश कनेरियाचे वक्तव्य; म्हणाला, पाकिस्तान ‘या’ बाबतीत भारतापेक्षा सरस

९. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १५ विकेट घेतल्या आहेत. हसरंगाने ६.४१ च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या आणि १३.२६ च्या सरासरीने विकेट घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortlisted players for icc t20 world cup 2022 player of the tournament award nominee vbm
Show comments