Shubman Gill Unfollows Rohit Sharma on Instagram: टी-२० विश्वचषक २०२४ साठी १५ सदस्यीय भारतीय संघ जेव्हा जाहीर करण्यात आला, त्यावेळेस चार राखीव खेळाडूंचाही समावेश करण्यात आला. ज्यामध्ये शुबमन गिल, आवेश खान, खलील अहमद आणि रिंकू सिंग यांचा समावेश होता. भारताने टी-२० विश्वचषकातील प्राथमिक फेरीतील सलग तीन सामने जिंकत सुपर८ फेरीत धडक मारली आहे. यासह आता राखीव खेळाडूंच्या यादीतील आवेश खान आणि शुबमन गिल हे भारतात परतणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी गिलला भारतीय संघातून रिलीज करण्यामागची काही कारणं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये असं म्हटलं जातंय की शुबमनला शिस्तीच्या कारणामुळे रिलीज केलं जात आहे आणि सोबतच त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केलं आहे.

शुबमन गिल हा टीम इंडियासोबत अमेरिकेला गेला होता. पण तो रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंना स्टेडियममध्ये सपोर्ट करतानाही दिसला नाही. रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद हे इतर राखीव खेळाडू न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान संघाला चिअर करताना दिसले.

हेही वाचा – IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

शुबमन गिल आणि आवेश खान प्राथमिक फेरीनंतर भारतात परतणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. कारण अमेरिकेत कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास बदली म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला होता. पण सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवरून शुबमन गिलला रिलीज करण्याचे कारण हे शिस्तभंगाचे आहे. शुबमन गिल अमेरिकेत टीमसोबत एकदाही दिसला नाही. खरं तर, बातमी अशी आहे की तो संघापासून दूर वेळ घालवताना दिसला आणि आपल्या इतर कामांमध्ये तो व्यग्र होता.

हेही वाचा – बेस्ट फिल्डरचं मेडल देण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला युवराज सिंग, सूर्यकुमारला म्हणाला- ‘सूर्या स्टाईल खेळी नव्हती….’

या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे की, शुबमन गिलने भारतीय कर्णधार रोहित शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तो आता रोहितला इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. टीम इंडिया आणि शुबमन गिल यांच्यात कदाचित काही ठीक चालले नसल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या एकदिवसीय विश्वचषकात गिलने भारतासाठी चांगली कामगिरी केली होती. मात्र यावेळी त्याला टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले नाही. राखीव खेळाडू म्हणून तो भारतीय संघासोबत अमेरिकेला गेला आहे. मात्र, आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांना उधाण आले आहे.