आयसीसी टी-20 विश्वचषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सकडून 13 धावांनी पराभव झाला, त्यानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशचा पराभव करावा लागला. पाकिस्तानने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीचे तिकीट पटकावले. अशात माजी भारतीय खेळाडू व्यंकटेश प्रसादने एक ट्विट करुन पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावर व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट केले की, ‘भगव्याने पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यास मदत केली.’ या ट्विटद्वारे व्यंकटेश प्रसाद यांनी तमाम पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना चिडवले आहे. वास्तविक नेदरलँडच्या जर्सीचा रंग भगवा असून व्यंकटेश प्रसाद यांनी याबाबत ट्विट केले आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक २०२२ मध्ये, न्यूझीलंड आणि इंग्लंड गट-१ मधून उपांत्य फेरीत पोहोचले आहेत, तर भारत आणि पाकिस्तान गट-२ मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. भारत त्यांचा शेवटचा साखळी सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळत आहे आणि जर ते जिंकले तर ते गट-२ मध्ये अव्वल राहतील आणि उपांत्य फेरीत पोहोचतील. तसेच १० नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये इंग्लंडशी त्यांचा सामना होईल. पण भारत हरला तर ९ नोव्हेंबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर त्यांना न्यूझीलंडशी सामना करावा लागेल.
टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशचा ५ विकेटसने विजय मिळवला.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १८.१ षटकांत ५ गडी गमावून १२८ धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.