South Africa vs Netherlands T20 WC 2024 Match Updates: डेव्हिड मिलरचा विजयी षटकार आणि दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर शानदार विजय मिळवला. मिलरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर ७ चेंडू आणि ४ विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मिलरने ५१ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ५९ धावा केल्या. संघाने झटपट ४ विकेट्स गमावल्यानंतर फलंदाजीला आलेला मिलर संघाला एकहाती विजय मिळवून देत नाबाद परतला. मिलरने नेदरलँड्सच्या भेदक गोलंदाजीला न जुमानता अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके लगावले. विजयी षटकारानंतर सिंहाप्रमाणे गर्जना करत मिलरने विदयाचा आनंद साजरा केला, यासह मिलरला सामनावीरही घोषित करण्यात आले.
डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सच्या शानदार भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिका संघाला नेदरलँड्सवर विजय मिळवण्यात यश आले. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सविरूद्ध विजय मिळवला खरा पण हा विजय संघासाठी अजिबातच सोपा नव्हता. नेदरलँड्सने या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेला बरोबरीची टक्कर दिली. पहिल्या तीन षटकांत तीन विकेट गमावत दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खूपच खराब झाली. पण मिलर आणि स्टब्सने संघाचा डाव सावरत तिसऱ्यांदा मोठा उलटफेर होण्यापासून संघाला वाचवले.
हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल
डेव्हिड मिलरने ट्रिस्टन स्टब्ससोबत पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेने पाचव्या षटकात १२ धावांत चार विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांना पराभूत करणारा नेदरलँड्सचा संघ पुन्हा एकदा अपसेट खेचून आणेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यानंतर मिलर आणि स्टब्सने सावध खेळ करत संघाला संकटातून बाहेर काढले.
नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो संघाच्या चांगलाच पथ्यावर पडला आणि नेदरलँड्सला जास्त धावा करण्याची संधी दिली नाही. नेदरलँड्सला २० षटकांत ९ विकेट्सवर केवळ १०३ धावा करता आल्या. नासाऊच्या उसळत्या खेळपट्टीवर नेदरलँड्स संघानेही ४८ धावांत ६ विकेट गमावल्या. दरम्यान सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांनी ४४ चेंडूत ५४ धावांची भागीदारी करत संघाला १०० चा आकडा गाठण्यात मदत केली. दक्षिण आफ्रिकेकडू ओटनेल बार्टमनने सर्वाधिक ४ विकेट घेतले. मार्को जॅन्सन आणि एनरिक नॉर्कियाने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
आजच्या सामन्यातील नेदरलँड्सच्या पराभवापूर्वी दोन वेळा या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजलं होतं. हे दोन सामने नेमके कोणते होते आणि त्यातील डच संघाची कामगिरीही शानदार राहिली होती. टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यातही नेदरलँड्सने आफ्रिकेच्या तोंडचं पाणी पळवलं होतं, पण मिलरमुळे सामना जिंकला.
धरमशालात स्कॉट एडवर्ड्सची झुंजार खेळी आणि विजय
१७ ऑक्टोबर २०२३ रोजी धरमशाला इथे वनडे वर्ल्डकपच्या लढतीत नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेवर ३८ धावांनी शानदार विजय मिळवला. नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावांची मजल मारली. सातव्या क्रमांकावर खेळणाऱ्या विकेटकीपर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाबाद ७८ धावांची झुंजार खेळी साकारली होती. त्याने १० चौकार आणि एका षटकारासह ही खेळी सजवली. रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह आणि आर्यन दत्त यांनी उपयुक्त खेळी करत स्कॉटला चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, मार्को यान्सन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. नेदरलँड्सच्या अचूक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली आणि त्यांचा डाव २०७ धावांतच आटोपला. डेव्हिड मिलर (४३) आणि केशव महाराज (४०) यांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीकने ३ तर पॉल व्हॅन मीकरन, रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह आणि बास डे लीड यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावत विजयावर शिक्कामोर्तब केलं. स्कॉट एडवर्ड्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हेही वाचा – आझम खान: घराणेशाहीचा आरोप होणारा वजनदार कार्यकर्ता का होतो ट्रोल?
अॅडलेडमध्ये घरचा आहेर
६ नोव्हेंबर २०२२ रोजी अॅडलेड इथे झालेल्या लढतीत नेदरलँड्सने १३ धावांनी दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची किमया केली होती. नेदरलँड्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. कॉलिन अॅकरमनने नाबाद ४१ धावांची खेळी केली. स्टीफन मायबर्गने ३७ तर टॉम कूपरने ३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. त्यांना १४५ धावाच करता आल्या आणि नेदरलँड्सने अविश्वसनीय विजयाची नोंद केली. आफ्रिकेतर्फे रायले रुसोने २५ धावा केल्या. नेदरलँड्सतर्फे ब्रँडन ग्लोव्हरने ३ तर फ्रेड क्लासन आणि बास डे लीड यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. कॉलिन अॅकरमनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.