‘कॅचेस विन मॅचेस’ ही उक्ती दक्षिण आफ्रिकेने टी२० वर्ल्डकपमधल्या इंग्लंडविरुद्धच्या लढतीत सार्थ ठरवली. अफलातून फिल्डिंगच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंडला अवघ्या ७ धावांनी नमवलं. बॉलिंगच्या बरोबरीने फिल्डिंगमध्ये सरस कामगिरी करत आफ्रिकेने या स्पर्धेत अपराजित राहण्याची परंपरा कायम राखली. आफ्रिकेने सामना जिंकला तरी प्रतिस्पर्धी इंग्लंड संघानेही तोडीस तोड फिल्डिंग करत दक्षिण आफ्रिकेला आटोक्यात आणलं होतं. एकूणातच हा सामना डोळ्याचं पारणं फेडणारा सामना होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने तडाखेबंद आफ्रिकेला तडाखेबंद सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेच्या षटकात क्विंटनने इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घेत फटकेबाजी केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्या षटकात क्विंटनने २१ धावा लुटल्या. आर्चर १२व्या षटकात परतला. स्लो कटर चेंडू मारण्याचा क्विंटनचा प्रयत्न फसला. स्टंप्सपाठी जोस बटलरने डाव्या दिशेने झेपावत सुरेख झेल घेतला आणि क्विंटनची खेळी संपुष्टात आणली. क्विंटन खेळपट्टीवर टिकला असता तर दक्षिण आफ्रिकेने दोनशे धावांची मजल मारली असती.

प्रचंड ताकद आणि खणखणीत टायमिंग हे हेनरिच क्लासनच्या खेळाचं वैशिष्ट्य. काही मिनिटात सामन्याचं पारडं पालटवण्याची क्षमता क्लासनकडे आहे. क्लासनच्या जोडीला डेव्हिड मिलरही असल्याने हे दोघे आफ्रिकेची नाव पैलतीरी नेणार असं चित्र होतं. मात्र जोस बटलरने अशक्य वाटणारा रनआऊट खरा करुन दाखवला. मार्क वूडचा उसळता चेंडू क्लासनने तटवून काढला. चेंडू बटलरच्या विरुद्ध म्हणजे डाव्या दिशेला गेला. तोवर मिलरने धाव घेण्यासाठी क्लासनला इशारा केला. त्याचा इशारा पाहून क्लासनने धावायला सुरुवात केली. तोवर बटलर चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्याने बऱ्यापैकी दूर असलेल्या नॉन स्ट्रायकिंग एन्डच्या स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेकला. बटलरचा नेम इतका अचूक होता की एक बेल्स पडली आणि त्यावेळी क्लासन क्रीझच्या बाहेर होता. ज्या ठिकाणहून बटलरने थ्रो केला तिथून स्टंप्स दिसत असले तरी अंतर खूप होतं. अतिशय गडबडीत चेंडूपर्यंत पोहोचूनही बटलरने शरीराचं संतुलन गमावलं नाही आणि इंग्लंडला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिलं. क्लासनच्या विकेटचं महत्त्व जाणून असल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी बटलरचं कौतुक करण्यासाठी धाव घेतली.

डेव्हिड मिलर फटकेबाजी करू लागला त्याचवेळी जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला फटका हॅरी ब्रूकच्या हातात जाऊन विसावला. ब्रूकने लाँगऑफ क्षेत्रात त्याचा उत्तम कॅच टिपला. सॅम करनने धावत मागे जाऊन कॅच घेतला आणि आर्चरची खेळी संपुष्टात आणली. इंग्लंडने दर्जेदार फिल्डिंगसह १६३ धावांची मजल मारली.

या लक्ष्याचा पाठलाग करताना धडाकेबाज फलंदाज फिल सॉल्टची भूमिका निर्णायक होती. पण रीझा हेन्ड्रिंक्सने डाव्या दिशेने झेपावत अफलातून कॅच घेत सॉल्टला माघारी धाडलं. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला जॉनी बेअरस्टो केशव महाराजच्या बॉलिंगवर बाद झाला. अँनरिक नॉर्कियाने चपळाईने कॅच टिपत बेअरस्टोला बाद केलं. ६१/४ अशी घसरण झालेल्या इंग्लंडला लायम लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रूक यांनी सावरलं. या जोडीने ४२ चेंडूत ७८ धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजयपथावर नेलं. लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर ब्रूकने सूत्रं हाती घेतली. शेवटच्या षटकात इंग्लंडला १४ धावांची आवश्यकता होती पण ब्रूक असल्याने इंग्लंडला चिंता नव्हती. नॉर्कियाच्या बॉलिंगवर आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने मिडऑनहून धावत मागे जाऊन अचंबित करणारा झेल घेतला. ब्रूक बाद झाला आणि इंग्लंडच्या जिंकण्याच्या आशा मावळल्या. सॅम करनने चौकार लगावत प्रयत्न केला पण तो अपुराच ठरला. आफ्रिकेने तुल्यबल लढतीत फिल्डिंगच्या जोरावर इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa england super 8 match was spectacular fielding display with outstanding catch by aiden markram anrich nortje reeza hendricks classic runout by jos butler splendid efforts psp
Show comments