अटीतटीच्या उत्कंठावर्धक लढतीत दक्षिण आफ्रिकेने यजमान वेस्ट इंडिजवर ३ विकेट्सने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली. पण या पराभवाने यजमान वेस्ट इंडिजच्या सेमी फायनलच्या आशा धुळीस मिळाल्या आणि त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. गट २ मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी सेमी फायनलमध्ये आगेकूच केली आहे.
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात कठीण अशा खेळपट्टीवर वेस्ट इंडिजचा संघ १३५ धावाच करू शकला. या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचीही भंबेरी उडाली. पण तणावपूर्ण स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयमाने खेळ करत बाजी मारली. पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला. १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कागिसो रबाडाने चौकार खेचला. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला ५ धावांची आवश्यकता होती. मार्को यान्सनने ओबेड मेकॉयच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
वेस्ट इंडिजच्या डावात रॉस्टन चेसने साकारलेली ५२ धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. काईल मेयर्सने ३५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ चेंडूत ८१ धावांची भागीदारी केली. या दोघांचा अपवाद वगळता वेस्ट इंडिजच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे तबरेझ शम्सीने ३ विकेट्स पटकावल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने रीझा हेन्ड्रिक्स, क्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम यांना झटपट गमावलं. हेनरिच क्लासन आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरला. क्लासनने गुदकेश मोटीच्या षटकात चौकार-षटकारांसह २० धावा वसूल केल्या. यामुळे लक्ष्य आटोक्यात आलं. मात्र अल्झारी जोसेफच्या उसळत्या चेंडूवर क्लासन बाद झाला. त्याने २२ धावा केल्या. यानंतर स्टब्सच्या साथीला डेव्हिड मिलर आला. फिनिशर मिलरला एकेक धावेसाठी संघर्ष करावा लागला. रॉस्टन चेसने त्याला त्रिफळाचीत केलं. चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा स्टब्सचा प्रयत्न मेयर्सच्या हातात जाऊन विसावला. प्रमुख फलंदाज माघारी परतल्याने दक्षिण आफ्रिकेची चिंता वाढली. त्यातच केशव महाराजही बाद झाला. चेसनेच त्याला बाद केलं. धावा आणि चेंडूचं प्रमाण नियंत्रणात असल्याने कागिसो रबाडा आणि मार्को यान्सन यांनी हिरिरीने खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजकडून चेसने ३ तर आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
तीन विकेट्स पटकावणाऱ्या शम्सीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.