SA vs AFG Highlights, T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. यंदाच्या विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. यासह अफगाणिस्तान संघाचे प्रथमच विश्वचषक फायनल खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९ विकेट्सने जिंकला, अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना ५६ धावा करून सर्वबाद झाला. तर दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत 57 धावांचे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स २९ धावा करून नाबाद परतला आणि कर्णधार एडन मारक्रम २३ धावा करून नाबाद परतला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने एकमेव विकेट घेतली. अफगाणिस्तानकडून एकमेव फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला, अजमतुल्ला उमरझाईने १० धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सन आणि तबरेझ शम्सी यांनी ३-३ तर एनरिक नॉर्खिया आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार रशीद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला नाही, कारण संघाने २३ धावांत ५ विकेट गमावल्या आणि अवघ्या ५६ धावा करून संपूर्ण संघ कोसळा. दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हन कोणताही बदल करण्यात आला नव्हता.