खराब कामगिरी आणि पावसाने केलेला दगाफटका यामुळे श्रीलंकेचं टी२० वर्ल्डकप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. नेपाळविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकत स्पर्धेतलं आव्हान जिवंत राखण्याची संधी श्रीलंकेकडे होती. मात्र पावसामुळे ही लढत रद्दच झाल्याने श्रीलंकेचा मार्ग खडतर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेला सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ७७ धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर अवघ्या १६.२ षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात त्यांनी हे लक्ष्य गाठलं. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा रनरेट उत्तम झाला मात्र श्रीलंकेली गच्छंती गुणतालिकेत तळाशी झाली.

गेल्या काही वर्षात श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामने अतिशय चुरशीचे होतात. भारत-पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या सामन्यांना जसं पारंपरिक द्वंद्वाचं स्वरुप येतं तसं या सामन्यांना येतं. वर्ल्डकपमधल्या लढतीतही हेच पाहायला मिळालं. अतिशय रंगतदार लढतीत बांगलादेशने श्रीलंकेवर २ विकेट्सनी विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १२४ धावांचीच मजल मारली. सलामीवीर पाथुम निसांकाचा ४७ धावांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजांला मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशतर्फे मुस्ताफिझूर रहमान, रिषाद हुसेन यांनी प्रत्येकी ३ तर तास्किन अहमदने २ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. लिट्टन दासने ३६ धावांची खेळी करत बांगलादेशचा डाव सावरला. तौहिद हृदॉयने २० चेंडूत एक चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावांची खेळी केली. अनुभवी महमदुल्लाने नाबाद १६ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंकेतर्फे नुवान तुषाराने १८ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेतल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

दोन सामन्यात दोन पराभव झाल्याने श्रीलंकेला नेपाळविरुद्ध दणदणीत विजय आवश्यक होता. मात्र पावसामुळे हा सामनाच होऊ शकला नाही. ड गटात दक्षिण आफ्रिकेचा दमदार आगेकूच करत आहे. दुसऱ्या जागेसाठी बांगलादेश, नेदरलँड्स यांच्यात चुरस आहे. श्रीलंकेने नेदरलँड्सविरुद्धचा सामना जिंकला तरी त्यांचे तीनच गुण होतील. त्यामुळे त्यांच्या सुपर८ फेरीच्या आशा मावळल्या आहेत.

पाकिस्तानचा कॅनडावर विजय
अमेरिका आणि पाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत यांच्याविरुद्ध पराभूत झाल्याने पाकिस्तानवर प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळण्याची वेळ ओढवणार असं चित्र होतं. मात्र कॅनडाविरुद्ध व्यावसायिक खेळ करत पाकिस्तानने आव्हान जिवंत राखलं आहे.

कॅनडाला प्रथम फलंदाजी करताना १०६ धावाच करता आल्या. सलामीवीर आरोन जॉन्सनने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावांची शानदार खेळी केली मात्र बाकी फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. मोहम्मद रिझवान (५३) आणि बाबर आझम (३३) यांच्या संयमी खेळीच्या बळावर पाकिस्तानने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. मोहम्मद आमिरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पाकिस्तानला सुपर८ साठी पात्र ठरण्यासाठी बऱ्याच जर तर समीकरणं जुळून येणं आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियाने उडवला नामिबियाचा धुव्वा
बलाढ्य ऑस्ट्रेलियाने अनुनभवी नामिबियाचा धुव्वा उडवत सुपर८ गटात आगेकूच केली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर नामिबियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. कर्णधार गेरहार्ड इरॅसमने ३६ धावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे फिरकीपटू अॅडम झंपाने १२ धावात ४ विकेट्स पटकावल्या. जोश हेझलवूड आणि मार्कस स्टॉइनस यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. ट्वेन्टी२० प्रकारात १०० विकेट्स पटकावणारा झंपा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फिरकीपटू आहे. हे छोटेखानी आव्हान ऑस्ट्रेलियाने अवघ्या ३२ चेंडूत पार करत दणदणीत विजय साकारला. ट्रॅव्हिस हेडने १७ चेंडूत ३४ तर मिचेल मार्शने ९ चेंडूत १८ धावांची खेळी केली. झंपाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka almost out of the t20 world cup after game against nepal got washout psp
Show comments