Suryakumar Yadav Rashid Khan Banter Video: सूर्यकुमार यादवने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध उत्कृष्ट खेळी करत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. भारताचे टॉप-३ फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरण्याचं मोठं काम सूर्याच्या खांद्यावर होतं. फलंदाजीसाठी कठीण खेळपट्टीवर टीम इंडिया झुंजत होती. अफगाणिस्तानने फिरकीच्या जाळ्यात भारताला अडकवून ठेवलं होतं. मात्र सूर्यकुमार यादवने येताच त्याने अफगाण गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. एकेकाळी भारताची धावसंख्या १६० पर्यंत पोहोचेल असे वाटत नव्हते. पण सूर्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर संघाला १८१ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.
हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण
सूर्यकुमार यादवने रशीदच्या गोलंदाजीवर मोठमोठे फटके मारले. ज्या रशीदने भारताच्या फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवलं त्याच रशीदच्या गोलंदाजीवर सूर्याने हल्लाबोल केला. सूर्याचा एक शानदार स्वीप शॉट तर पाहण्यासारखा होता. या शॉटनंतर रशीद आणि सूर्या मैदानात मधोमध बोलतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. जे कॉमेंट्री करणाऱ्या रवी शास्त्रींनी सांगितलं की तिथे नेमकं काय घडतंय.
रशीद खान अफगाणिस्तानचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. ऋषभ पंतला बाद केल्यानंतर रशीदने विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने शिवम दुबेला पॅव्हेलियनमध्ये धाडले. पण त्याच्या गोलंदाजीचा सूर्यकुमार यादववर काहीही परिणाम झाला नाही. रशीदने आपल्या स्पेलमध्ये सूर्याविरुद्ध ६ चेंडू टाकले. यावर त्याने १६ धावा केल्या.
सूर्यकुमार यादवच्या उत्तराने रशीदची केली बोलती बंद
रशीद खानविरुद्ध सूर्यकुमार यादवने स्वीप शॉट लगावत धावा केल्या. षटकारांसह दोन्ही चौकारही स्वीप शॉट करत सूर्याने मारले. रशीद खान सूर्यकुमार यादवचे चेंडू सीमारेषेबाहेर धाडल्यानंतर त्याच्याशी बोलताना दिसला. यावेळी रवी शास्त्री सामन्याचे समालोचन करत होते. ते पाहून रशीद सूर्यकुमारला काय म्हणत असेल याचा अंदाज लावत शास्त्रींनी कॉमेंट्री केली. कॅमेऱ्यासमोर रशीदवर होता, मग शास्त्री म्हणाले, रशीद सूर्याला म्हणतोय, माझ्या गोलंदाजीवर स्वीप शॉट्स मारू नको.’ सूर्या देखील रशीदला उत्तर देताना दिसला आणि शास्त्री यांनी म्हटलं की सूर्यकुमार म्हणतोय, ‘माझी यात काही चूक नाहीय!’
सूर्या ठरला सामनावीर
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट गमावत १८१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत ५३ धावांची धुव्वाधार खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही पहिल्याच षटकात वेगवान सुरुवात केली. मात्र त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या साथीने टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले. अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि भारताने हा सामना ४७ धावांनी जिंकला.