आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये ४२ वा सामना भारत आणि झिम्बाब्वे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याचबरोबर त्याने एक मोठा विक्रम नोंदवला.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, ५ बाद १८५ धावा केल्या होत्या. तसेच झिम्बाब्वे संघाला विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघ १७.२ षटकांत ११५ धावांवर आटोपला. तत्पुर्वी या सामन्यात सूर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक झळकावले. ज्यामध्ये त्याने २४४ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना २५ चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या. आपल्या या झंझावाती खेळीदरम्यान, सूर्यकुमारने सहा चौकार (२४ धावा) आणि चार षटकार (२४ धावा) लगावले, म्हणजेच त्याने १० चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या.
सूर्यकुमारचे या विश्वचषकातील हे तिसरे अर्धशतक आहे, याआधी त्याने नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अर्धशतके झळकावली होती. यासोबतच त्याने काही खास रेकॉर्डही आपल्या नावावर केले.
एका वर्षात १००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावा –
एका वर्षात १००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा सूर्यकुमार भारतातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. या डावासह, सूर्यकुमारने २०२२ साली २८ डावांमध्ये ४४.६च्या सरासरीने आणि १८६.५४ च्या स्ट्राइक रेटने १०२६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. यापूर्वी हा पराक्रम फक्त पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने केला होता. रिझवानने २०२१ मध्ये २६ डावात १३२६ धावा केल्या होत्या.
२०० च्या स्ट्राइक रेटसह सहाव्यांदा पन्नासपेक्षा अधिक धावा –
सूर्यकुमार २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह सर्वाधिक पन्नासपेक्षा अधिक धावा बनवल्याबद्दल टी-२०आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संयुक्त प्रथम स्थानावर पोहोचला आहे. २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह हा त्याच्या सहाव्यांदा पन्नासपेक्षा अधिक धावा आहेत. या बाबतीत त्याने ग्लेन मॅक्सवेल आणि एव्हिन लुईसची बरोबरी केली.
20व्या षटकात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज –
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हार्दिक पांड्या आणि एमएस धोनी यांच्या नावावर आहे. पांड्याने १२३ चेंडूत १२ षटकार तर धोनीने २५१ चेंडूत १२ षटकार लगावले आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमारने २० व्या षटकात खेळलेल्या १८ चेंडूत १० षटकार लगावले आहेत.