South African fans object to Surya’s catch : टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अंतिम सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. हार्दिक पंड्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने सीमा रेषेवर डेव्हिड मिलरचा करिष्माई झेल घेतल्याने दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या. डेव्हिड मिलर (२१) बाद होताच दक्षिण आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला आणि टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी त्यांच्या हातातून निसटली. सूर्यकुमार यादवचा हा झेल सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.

सूर्यकुमार यादवच्या झेलबाबत प्रश्न उपस्थित –

मात्र, सूर्यकुमार यादवच्या या झेलबद्दल सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेतील मीडिया आणि त्यांचे काही चाहते टीम इंडिया आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्याने झूमच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर केला असून सूर्यकुमार यादवच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला टी-२० विश्वचषक विजेतेपदापासून वंचित राहावे लागले की काय असा आरोप काही चाहते करत आहेत. अंपायरने घाईघाईत चुकीचा निर्णय दिल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे. काही चाहत्यांनी सीमारेषेचे नियम सांगताना म्हटले की सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल षटकार होता.

सूर्याच्या झेलने सामन्याला दिली कलाटणी –

हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिलरला झेलबाद केले. हा उत्कृष्ट झेल सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत जाऊन घेत सामन्याला मोठी कलाटणी दिली. ज्यामुळे हा सामना भारतीय संघाच्या पारड्यात झुकला. त्यानंतर या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला.

हेही वाचा – IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’ने सामन्याला दिली कलाटणी, ज्यामुळे भारताने ११ वर्षानंतर ICC ट्रॉफीवर कोरलं नाव, पाहा VIDEO

भारताचा ११ वर्षाचा दुष्काळ संपला –

यासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अधुरे राहिलेले स्वप्न अखेर वेस्ट इंडिजमध्ये पूर्ण झाले. तेव्हा रोहित शर्माच्या संघासह टीव्हीसमोर बसलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचे डोळे भरून आले होते. या विजयाचा नायक विराट कोहली होता ज्याने विजयासोबतच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा केला. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.