टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये आजपसून उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचा सामना होणार असून उद्या म्हणजेच गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे. आजचा सामना सिडनीमध्ये होणार आहे तर भारताचा सामना ॲडलेडच्या मैदानावर होणार आहे. मात्र उपांत्यपूर्वी फेरीच्या सामन्यांंआधीच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा संघ इतर संघांच्या मदतीने उपांत्य फेरीत पोहोचलेला असताना पाकिस्तानपेक्षा अधिक सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाबद्दल आफ्रिदीने केलेलं विधान आश्चर्यचकित करणारं असल्याचं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> सुंदर दिसत नाहीस तरी बुमराहला कसं पटवलं? विचारणाऱ्या ट्रोलरला संजना गणेशनचं उत्तर; म्हणाली, “तू स्वत: चप्पलेसारखा…”
भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या उपांत्य फेरीतील सामन्यासंदर्भात बोलताना पाकिस्तानच्या माजी कर्णधाराराने बादफेरीमध्ये भारत बाहेर पडेल अशाप्रकारचं विधान केलं आहे. भारत आणि इंग्लंड सामन्यामध्ये आपली पहिली पसंती इंग्लंडच्या संघाला असल्याचं आफ्रिदीनं म्हटलं आहे. समा टीव्ही या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमामध्ये विश्वचषक स्पर्धेसंदर्भात मतप्रदर्शन करताना आफ्रिदीने इंग्लंडच्या संघाला झुकतं मत दिलं आहे.
नक्की वाचा >> “भारत पाकिस्तान अंतिम सामना व्हावा असं अनेकांना वाटतंय” असं म्हणत प्रश्न विचारताच बेन स्टोक्स म्हणाला, “आम्ही इथे फक्त…”
आफ्रिदीने इंग्लंडच्या संघामध्ये अधिक समतोल असल्याचंही म्हटलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीचा उत्तम मेळ इंग्लंडच्या संघामध्ये आहे. इंग्लंडकडे उत्तम फिरकी गोलंदाज असल्याचंही आफ्रिदीने नमूद केलं आहे. याच संघिक समिकरणामुळे इंग्लंड उपांत्य फेरीतील सामना जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे. “दोन्ही संघांमधील समतोल उत्तम आहे. दोन्ही संघांनी मालिकेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यापूर्वीही त्यांची कामगिरी उत्तम राहिलेली आहे. मात्र माझ्या मते इंग्लंड भारतापेक्षा सरस ठरण्याची शक्यता ६० ते ६५ टक्के इतकी आहे,” असं आफ्रिदीने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> T20 World Cup: …तर इंग्लंडविरुद्ध मैदानात न उतरता भारतीय संघ थेट वर्ल्डकप फायनल खेळणार
भारत विरुद्ध इंग्लंडची आकडेवारी काय सांगते? कोणाचं पारडं जड?
भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान टी-२० चे २२ सामने झाले असून त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक सामने भारताने जिंकले आहेत. इंग्लंड आणि भारतादरम्यान झालेल्या तीन टी-२० विश्वचषक सामन्यांपैकी एकामध्ये इंग्लडने विजय मिळवला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता या वर्षीच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये भारत आपलं वर्चस्व कायम राखणार की इंग्लंड भारताला धक्का देणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.