ब्रिजटाऊन : एकीकडे २०१३ नंतर ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धेत जेतेपदाची प्रतीक्षा करणारा भारतीय संघ, तर दुसरीकडे आजवर कधीही विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाची चव न चाखलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ. मात्र, दोन्ही संघांत क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता. त्यातच दोन्ही संघ अपराजित. दोन्ही संघांत तारांकितांची भरणा. आता हे दोन तुल्यबळ संघ आज, शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आमनेसामने येणार असल्याने जेतेपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणे अपेक्षित आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग दुसऱ्या वर्षी ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळणार आहे. गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातही भारतीय संघाने अंतिम फेरीचा टप्पा गाठला होता. ती स्पर्धा आणि आताची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा यातील भारतीय संघाच्या कामगिरीत बरेच साम्य आहे.
एकदिवसीय विश्वचषकात भारताने आपले सर्व सामने जिंकताना चाहत्यांना जेतेपदाचे स्वप्न दाखवले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा अंतिम अडथळा पार करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला होता. ट्वेन्टी-२० विश्वचषकात पावसामुळे भारताचा कॅनडाविरुद्धचा साखळी सामना रद्द करावा लागला. मात्र, त्या व्यतिरिक्त भारताने आपले सर्व सामने जिंकतच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता तरी भारतीय संघ आपली दशकभरापासून जेतेपदाची प्रतीक्षा संपवेल अशी चाहत्यांना आशा आहे. भारतीय संघाने आपली अखेरची ‘आयसीसी’ स्पर्धा २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडकाच्या स्वरूपात जिंकली होती.
हेही वाचा >>> IND vs SA T20 WC Finals: विराट कोहलीच्या भूमिकेबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, “काही मोठे बदल..”
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला आजवर केवळ एकदाच ‘आयसीसी’ची स्पर्धा जिंकता आली आहे. त्यांनी १९९८ मध्ये चॅम्पियन्स करंडक (तेव्हाची ‘आयसीसी’ नॉक-आऊट करंडक) स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. मात्र, क्रिकेटच्या कोणत्याही प्रारूपातील विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत मिळून तब्बल आठ वेळा उपांत्य फेरीत गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’चा शिक्का लागलेला आहे. मोक्याच्या क्षणी खेळ खालावत असल्याने त्यांना असे संबोधले जाते. मात्र, बार्बाडोस येथे होणारा अंतिम सामना जिंकून आपल्यावरील ‘चोकर्स’चा शिक्का कायमचा पुसून टाकण्याची दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे संधी आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ ही संधी साधतो की भारतीय संघ आपले दुसरे ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपद पटकावतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
द. आफ्रिकेचा स्पर्धेतील प्रवास
साखळी फेरी
वि. श्रीलंका : सहा गडी राखून विजयी
वि. नेदरलँड्स : चार गडी राखून विजयी
वि. बांगलादेश : चार धावांनी विजयी
वि. नेपाळ : एका धावेने विजयी
अव्वल आठ फेरी
वि. अमेरिका : १८ धावांनी विजयी
वि. इंग्लंड : सात धावांनी विजयी
वि. विंडीज : तीन गडी राखून विजयी
उपांत्य फेरी
वि. अफगाणिस्तान : नऊ गडी राखून विजयी
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल.
भारताचा स्पर्धेतील प्रवास
साखळी फेरी
वि. आयर्लंड : आठ गडी राखून विजयी
वि. पाकिस्तान : सहा धावांनी विजयी
वि. अमेरिका : सात गडी राखून विजयी
वि. कॅनडा : पावसामुळे सामना रद्द
अव्वल आठ फेरी
वि. अफगाणिस्तान : ४७ धावांनी विजयी
वि. बांगलादेश : ५० धावांनी विजयी
वि. ऑस्ट्रेलिया : २४ धावांनी विजयी
उपांत्य फेरी
वि. इंग्लंड : ६८ धावांनी विजयी
बुमरा, कुलदीपवर मदार
भारतीय संघाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील यशामागे हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि गोलंदाजांचा प्रभावी मारा, ही प्रमुख कारणे ठरली आहेत. विशेषत: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (७ सामन्यांत १३ बळी) आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (४ सामन्यांत १० बळी) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच अर्शदीप सिंग (७ सामन्यांत १५ बळी) आणि अक्षर पटेल (७ सामन्यांत ८) यांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल.
कोहली, दुबेबाबत चिंता; रोहित लयीत
विराट कोहली आणि शिवम दुबे यांना फारसे योगदान देता आलेले नाही. कोहलीला सात डावांत केवळ ७५ धावा करता आल्या आहेत. मात्र, अंतिम सामन्यात कोहली आपला सर्वोत्तम खेळ करेल अशी भारताला आशा असेल. तसेच दुबेने काही उपयुक्त खेळी केल्या असल्या, तरी दर्जेदार वेगवान गोलंदाजांसमोर तो अडखळताना दिसत आहे. त्याने सात डावांत केवळ १०६ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माला यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात सूर गवसण्यासाठी वेळ लागला. मात्र, मोक्याच्या क्षणी त्याने आपले वेगळेपण सिद्ध केलेच. ‘अव्वल आठ’ फेरीतील अखेरच्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूंतच ९२ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवताना उपांत्य फेरीच्या सामन्यात ३९ चेंडूंत ५७ धावा फटकावल्या. सूर्यकुमार यादवही चमकदार कामगिरी करत आहे. इंग्लंडविरुद्ध आव्हानात्मक खेळपट्टीवर त्याने ३६ चेंडूंत ४७ धावांची शानदार खेळी केली.
२६ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २६ ट्वेन्टी-२० सामने झाले आहेत. यापैकी १४ सामने भारताने जिंकले आहेत.
पावसाचा अडथळा?
या विश्वचषकात वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अन्य सामन्यांप्रमाणेच अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मात्र, कॅरेबियन बेटांवरील लहरी वातावरणामुळे सामना वेळेवर सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसामुळे शनिवारी खेळ न होऊ शकल्यास, रविवार हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
खेळपट्टी कशी?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम लढत केन्जिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवली जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी सामान्यत: सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते. मात्र, काही षटकांनंतर फलंदाजांना अधिक मोकळेपणाने खेळता येते. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना १६० अशी सरासरी धावसंख्या आहे. भारताने या मैदानावर ‘अव्वल आठ’ फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १८१ धावा केल्या होत्या.
प्रशिक्षक द्रविडला विजयी निरोप?
राहुल द्रविडचा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा सामना असणार आहे. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संपुष्टात आला होता. मात्र, बीसीसीआयने द्रविडला ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत मुदतवाढ दिली. आता ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकत द्रविडला अविस्मरणीय निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. २००७ मध्ये वेस्ट इंडिज येथेच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. आता या कटू आठवणी पुसून टाकण्यासाठी द्रविड प्रयत्नशील असेल.