ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर १२ चा पहिला सामना खेळला जात आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला पार पडत आहे. या सामन्यात किवी संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर त्याने बाबर आझमच्या एक विक्रमाशी बरोबरी केली आहे.
विराट कोहलीचा विक्रम मोडीत –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा हा विराटच्या नावावर होता. विराट कोहलीने २७ डावात हा टप्पा गाठला होता. परंतु आज कॉन्वेने २६ डावात हा पल्ला पार केला आहे. त्याने विराटपेक्षा एक डाव कमी घेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला आहे.
बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी
तसेच कॉन्वेने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बाबर आझमने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या विक्रमाशी कॉन्वेने बरोबरी केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज इंग्लंडचा डेव्हिड मलान आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या २४ डावांत हा आकडा पार करून हा विक्रम केला होता.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज-
डेव्हिड मलान – २४ डाव
डेव्हॉन कॉनवे – २६* डाव
बाबर आझम – २६ डाव
विराट कोहली – २७ डाव
अॅरॉन फिंच – २९ डाव
केएल राहुल – २९ डाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात डेव्हॉन कॉन्वेने ९२ धावांची नाबाद खेळी खेळली. ज्यामुळे न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाला २०१ धावांचे मोठे लक्ष्य दिले. तसेच डेव्हॉन कॉन्वेच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये १०३३ धावा झाल्या आहेत. त्याने ५७.३९ च्या सरासरीने आणि १३६.१० च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.