टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत आणि पाकिस्तान संघाचा सामना रविवारी पार पडला. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने मागील स्पर्धेतील बदला घेताना, ४ विकेट्सने विजय मिळवला. भारत-पाक हाय व्होल्टेज सामन्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात चाहते उपस्थित होते. याबाबत आयसीसीने ट्विट करत, किती प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते, याची आकडेवारी जाहीर केली आहे.
आयसीसीने ट्विट करताना म्हटले की, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे रविवारी ९०,२९३ प्रेक्षकांनी टी-२० विश्वचषक २०२२ चा भारत-पाकिस्तान सामना पाहिला. त्याचबरोबर आयसीसीच्या ट्विटवर एका चाहत्याने म्हटले की, “९०,२९३ भाग्यवान लोकांनी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना पाहिला.” विराट कोहलीच्या नाबाद ८२(५३) च्या खेळीमुळे भारताने शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्ताने संघान प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १५९ धावा केल्या होत्या. तसेच भारतीय संघाला विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ६ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.
शेवटच्या षटकात भारतीय संघाला १६ धावांची होती गरज –
पहिल्या बॉलवर पांड्या बाद होताच दिनेश कार्तिक मैदानात आला. नवाझच्या दुसऱ्या बॉलवर एक धाव काढून पुन्हा विराटकडे स्ट्राईक दिली. तिसऱ्या बॉलवर विराटने दोन धावा काढल्या. यानंतर चौथा बॉलहा नो बॉल ठरला. पण यावरही विराटने षटकार ठोकून टीम इंडियाला विजयीपाथवर आणले. नो बॉलनंतर पुढच्या बॉलवर विराट क्लीन बोल्ड झाला होता मात्र फ्री हिट असल्यामुळे त्याचा बचाव झाला. पण यावेळी त्याने तीन महत्त्वाच्या धावा (बाईज) घेतल्या.
विराटच्या या स्मार्ट खेळानंतर पुढच्या बॉलवर दिनेश कार्तिक क्लीन बोल्ड झाला व आर. आश्विन स्ट्राईकवर आला. यानंतर पुन्हा नवाझकडून एक वाइड बॉल टाकण्यात आला आणि अखेरीस १ बॉल वर १ अशी स्थिती असताना आर आश्विनने विजयी धाव घेऊन टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.