आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील सामना आज बांगलादेश विरुद्ध नेदरलँड संघात झाला. हा सामना होबार्ट येथे पार पडला. या सामन्यात बांगलादेशने तस्किन अहमदच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर, नेदरलँड ९ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १४५ धावांचे लक्ष्य नेदरलँड समोर ठेवले. परंतु नेदरलँडचा संघ १३५ धावांवरच आटोपला. बांगलादेशचा गोलंदाज तस्किन अहमद (4/25) याला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

नेदरलँडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. नजमुल हुसेन शांतो आणि सौम्या सरकार यांनी संघाच्या डावाची सलामी दिली. त्याचबरोबर पहिल्या विकेटसाठी ४३ धावा जोडल्या. पॉल व्हॅन मीकरेनने १४ च्या वैयक्तिक धावेवर सरकारला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिली. दुसरा सलामीवीर शांतोने २५ धावांवर बाद झाला.

लिटन दास आणि शकिब अल हसन यांनी निराशा केली आणि दोन्ही फलंदाज अनुक्रमे ९ आणि ७ धावांवर बाद झाले. त्यानंतर आणखी काही गडी बाद झाले. पण अफिफ हुसैन ३८ आणि मोसाद्देक हुसेन नाबाद २० धावांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात मदत केली. नेदरलँड्ससाठी बास डी लीड आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हेही वाचा – IND vs PAK T20 World Cup 2022 : मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये भारताच्या विजयाचे तब्बल ‘इतके’ प्रेक्षक होते साक्ष, पाहा आकडेवारी

लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडची सुरुवात खराब झाली. सलामीचे फलंदाज विक्रमजीत सिंग आणि बास डी लीड एकही धाव न काढता तस्किन अहमदचे बळी ठरले. आणखी दोन गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या १५/४ अशी झाली. येथून कॉलिन अकरमन आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने डाव सांभाळण्याचे काम केले आणि धावसंख्या ५९ पर्यंत नेली. शकीब अल हसनने २४ चेंडूत १६ धावा करून खेळणाऱ्या एडवर्ड्सला बाद केले.

अकरमनही ४८ चेंडूत ६२ धावा केल्यानंतर १७ व्या षटकात बाद झाला. खालच्या फळीत पॉल व्हॅन मीकर्नने २४ धावा केल्या. मात्र तो आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकला नाही. बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक ४ बळी घेतले.