सिडनी : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा निर्णायक साखळी सामना रंगणार आहे. या सामन्याच्या निकालावर गट-१ मधून उपांत्य फेरी गाठणारा दुसरा संघ निश्चित होईल. इंग्लंडने विजय मिळवल्यास ते उपांत्य फेरीत स्थान मिळवतील, तर श्रीलंकेला सामना जिंकण्यात यश आल्यास ऑस्ट्रेलिया आगेकूच करेल.   त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या अ‍ॅशेस प्रतिस्पर्ध्यांचे भवितव्य श्रीलंकेच्या हातात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे ७ गुण झाले असून ते गट-१मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. अग्रस्थानावरील न्यूझीलंडचेही ७ गुण असले, तरी त्यांची निव्वळ धावगती सर्वोत्तम असल्याने त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात स्पर्धा आहे.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला विजय अनिवार्य आहे. श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी त्यांनी उलटफेर केल्यास ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत स्थान मिळेल. तसेच सामना पावसामुळे रद्द झाला, तरी इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर जाईल. ऑस्ट्रेलियाच्या (-०.१७३) तुलनेत इंग्लंडची (०.५४७) निव्वळ धावगती सरस आहे. मात्र, इंग्लंडचा पराभव झाल्यास निव्वळ धावगतीला महत्त्वच राहणार नाही.

इंग्लंडला कर्णधार जोस बटलर, अ‍ॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान आणि लियाम लििव्हगस्टोन यांच्याकडून फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, तर गोलंदाजीची धुरा मार्क वूड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन सांभाळतील. श्रीलंकेला या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास वानिंदू हसरंगा आणि धनंजय डिसिल्वा यांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल.

’ वेळ : दु. १.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,  १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup 2022 england vs sri lanka match prediction zws