टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या भलत्याच फॉर्मात आहे. विराट टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत धावांचा पाऊस पाडण्याचे काम करत आहे. विराटने एकामागोमाग एक अर्धशतकांचा धडाकाच लावला आहे. त्याने बुधवारी ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाच्या ३५व्या सामन्यात जबरदस्त नाबाद अर्धशतक झळकावले आणि एक असा काही उत्तंगु षटकार खेचला, ज्याचा व्हिडिओ स्वत: आयसीसीने त्यांच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिनेदेखील लक्षवेधी कमेंट केली. सध्या याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, विराटच्या या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या डॅनियलने ४ एप्रिल, २०१४ रोजी मध्यरात्री अनेक ट्वीट करत विराटबद्दल प्रेम व्यक्त केले होते. यावेळी तिने ट्वीटमध्ये विराटचे नाव चुकीचे लिहिले होते. त्यानंतर विराटने तिची भेट घेतल्यानंतर तिला एक बॅट भेट म्हणून दिली होती. डॅनियल नेहमीच अर्जुन तेंडुलकर याच्याबद्दल ट्वीट करत असते.
दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारताकडून या सामन्यात विराट कोहली याने सर्वाधिक ६४ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त केएल राहुल (५०) आणि सूर्यकुमार यादव (३०) यांनीही महत्त्वाची खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताचा पुढील सामना हा रविवारी झिम्बाब्वे बरोबर असणार आहे. सध्या ग्रुप मध्ये भारत अव्वलस्थानी आहे. जर पाकिस्ताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर यात फार मोठे काही बदल घडणार नाहीत. पण यामुळे टीम इंडिया ग्रुपमध्ये अव्वलस्थानी कायम राहू शकते.