गुरुवारी (३ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज फखर जमान या सामन्यातून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर नजीब सूमरो यांनी याला दुजोरा दिला आहे.
नजीब सूमरो म्हणाले, नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान फखर जमानच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध होणार नाही.
भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये फखरला संघात संधी मिळाली नाही. नेदरलँड्सविरुद्ध, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, ज्यामध्ये त्याने १६ चेंडूत २० धावा केल्या. फखर जमानची याआधी टी-२० विश्वचषकाच्या संघात निवड झाली नव्हती, मात्र उस्मान कादिरच्या दुखापतीनंतर त्याचा या स्पर्धेसाठी संघात समावेश करण्यात आला.
पाकिस्तानचा संघ सध्या तीन सामन्यांत एका विजयासह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. टेंबा बावुमाचा संघ सुपर १२ मध्ये एकही सामना हरलेला नाही. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश आणि भारताचा पराभव केला.