टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील चौथा सामना भारत आणि पाकिस्तान संघात पार पडला. मेलबर्न येथे झालेल्या थरारक सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय नोंदवला. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यानी मोलाचे योगदान दिले. या विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो विराटला म्हणाला होता, ”तू करू शकशील, फक्त शेवटपर्यंत उभा रहा.”
या सामन्यात पाकिस्ताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ बाद १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ६ गडी गमावून १६० धावा करत विजय नोंदवला. त्याचबरोबर मागील विश्वचषकातील बदला देखील घेतला. त्याचबरोबर हार्दिक पांड्या सामन्यानंतर मनोगत व्यक्त करताना भावनिक झालेला दिसला.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ८२ धावा केल्या. त्यापाठोपाठ हार्दिक पांड्याने देखील ३७ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. इतर भारतीय फलंदाजांना १६ धावांचा टप्पा करता आला नाही. पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना हरीस रौफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नसीम शाहने एक विकेट घेतली. हरीस रौफने ३६ आणि मोहम्मद नवाजने ४२ धावा दिल्या. तसेच नसीम शाहने २५ धावा दिल्या.
विजयानंतर बोलताना हार्दिका पांड्या म्हणाला, ”विराट कोहलीनं आजपर्यंत अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. पण आज सुरुवातीला फार कठीण होतं खेळणं. पण त्यानी सुरुवातीपासून वेगळा अॅटिट्युड ठेवला. उगीच नाही त्याला किंग कोहली म्हणत. ज्या पद्धतीने त्यानं दोन षटकार लगावले, ते माझ्या आयुष्यातले सर्वोत्तम षटकार होते. मी विराटला फक्त एकच गोष्ट बोलत होतो, आपण भागीदारी उभी करुयात.”
पांड्या पुढे म्हणाला, ”सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आम्ही सगळे सोबत होतो. जिंकलो तर सोबत, हरलो असतो तरी सोबत हरलो असतो.”