न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलर सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीने खूपच प्रभावित झाला आहे. त्याला वाटते की आयसीसी क्रमवारीतील नवीन नंबर १ टी२० फलंदाजाचे भविष्य आणखी चांगले असू शकते. सूर्यकुमार बुधवारी केवळ ३७ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. उजव्या हाताच्या या फलंदाजाने ११७ च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेट आणि ४०.६५ च्या सरासरीने शानदार खेळी केल्या आहेत. भारतासाठी २१ टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना क्रमांक १ रँकिंगमध्ये पोहचणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला.
सूर्यकुमारने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत आपले एकमेव टी२० शतक झळकावले आणि ४६.५६ च्या सरासरीने आणि १८४.८६ च्या स्ट्राइक रेटसह त्याच्या सामान्य स्थितीत क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. पण सूर्यकुमारने भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीत सुधारणा केल्यास त्याचा आणखी मोठा परिणाम होऊ शकतो, असे टेलरचे मत आहे.
रॉस टेलर सुर्यकुमार यादवविषयी केले भाकीत
रॉस टेलर सुर्याविषयी बोलताना म्हणाला की, “संघात मधल्या फळीत क्रमांक चार-पाच हे टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी सर्वात कठीण ठिकाण आहे. जेव्हा तुम्ही केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली, काही महान फलंदाजांच्या मागे फलंदाजी करत असाल तेव्हा अव्वल क्रमांकावर असणे ही सोपी गोष्ट नाही. अशी कामगिरी करणे क्वचितच एखाद्या महान खेळाडूला जमते, सर्वांच्याच आवाक्यातील ही गोष्ट नाही.” तो पुढे म्हणाला, “मला खात्री आहे की कालांतराने तो वरच्या क्रमाने फलंदाजी करण्यास सुरुवात करेल किंवा परंतु चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून एवढे मोठे यश मिळवणे माझ्या दृष्टीने हे एक आश्चर्य आहे असून त्याने सत्यात उतरवले आहे.”
रॉस टेलर सुर्यकुमार यादवविषयी बोलताना म्हणाला की, “तो कसा फलंदाजी करतो हे मला माहीत नाही. पण तो त्यावेळेस असणारी परिस्थितीशी जुळवून घेत फलंदाजी करतो. नुसते चौकार-षटकारच नाही तर त्यादरम्यान तो एकेरी-दुहेरी आणि मोठे मैदान असेल तर तिहेरी धावा देखील चांगल्या काढतो यामुळे स्ट्राइक रोटेट होण्यास मदत होते आणि गोलंदाजावर दबाव वाढत जातो. त्याच्यात मैदानाच्या सर्व बाजूंना फटके मारण्याची क्षमता असून म्हणूनच त्याला सगळेजण ‘मिस्टर ३६०’ असे म्हणतात. असे फटके फक्त एकच खेळाडू मारू शकतो ज्याच्यात खूप आत्मविश्वास आहे. एकदा का तो खेळपट्टीवर स्थिरावला की मग तो चांगली फलंदाजी करण्यास सुरुवात करतो, त्याला गोलंदाज काय विचार करत आहे हे आधीच कळते. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. भविष्यातील खूप मोठा फलंदाज उदयास येत आहे.” असे म्हणत त्याने त्याला शुभेच्छा दिल्या.