भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सहेवागने टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीमधील भारताच्या अंतिम सामन्याच्या आधी मोठं विधान केलं आहे. उपांत्यफेरीत कोणाविरुद्ध सामना खेळायचा आहे हे भारत ठरवू शकतो असं सूचक विधान सेहवागने केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने दोन्ही गटांमधील अंतिम सामना खेळण्याचा फायदा घ्यावा असं स्पष्ट मत सेहवागने व्यक्त केलं आहे. सेहवागने अप्रत्यक्षपणे भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना मुद्दाम पराभूत झालं तरी हरकत नाही याकडे इशारा केला आहे. उपांत्यफेरीमध्ये आर या पारची लाढाई होणार आहे. म्हणजेच एक सामना पराभूत झाल्यास संघ स्पर्धेबाहेर पडणार. त्यामुळेच भारताने दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थानी रहावं की दुसऱ्या स्थानी रहावं हे ठरवावं, असं सेहवागचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Zim: शेवटच्या सामन्यात पाऊस पडला तर…; पाकिस्तानपेक्षा कमी नेट रन रेट असल्याने भारत स्पर्धेबाहेर पडणार की…
‘क्रिकबझ’शी बोलताना सेहवागने यासंदर्भात विधान केलं आहे. “त्यांना (साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणाऱ्या भारताला) ठाऊक असेल की ग्रुप एकमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणता संघ आहे तर ते (उपांत्यफेरीत) कोणाविरुद्ध खेळायचं हे ठरवू शकतात. हे माझं मत आहे,” असं सेहवागने सांगितलं. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना पराभूत झाल्यास भारत दुसऱ्या स्थानी असेल. याचसंदर्भात सेहवागने “(शक्य असेल झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत होणं) का पसंत करु नये? टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी एखादा सामना गमावावा लागला तर मी तरी तसं केलं असतं,” असंही म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…
“दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांचा शेवटचा सामना (नेदरलॅण्ड्सविरुद्ध) जिंकला तर त्यांचे एकूण सात गुण असतील. त्यामुळे भारत ठरवू शकतो की त्यांनी गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रहायचं आहे की पहिल्या. त्यामुळे भारताकडे पर्याय आहे. ते ठरवू शकतात की त्यांना समोरच्या गटातील कोणाविरुद्ध खेळायचं आहे,” असंही सेहवागने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण
सध्यातरी दुसऱ्या गटामधून भारत आणि दक्षिण आफ्रिकाच उपांत्यफेरीमध्ये प्रवेश करतील असं चित्र दिसत आहे. दुसऱ्या गटातील अव्वल संघ पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी खेळणार आहे. त्यामुळेच झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारताने जिंकला तर भारताला दुसऱ्या स्थानावरील संघाशी उपांत्यफेरीत खेळावं लागेल. भारताकडे सध्या सहा गुण आहेत. शेवटचा सामना जिंकून ते आठ गुणांसहीत अव्वल स्थान कायम राखू शकतात. तर दक्षिण आफ्रिकेकडे चार सामन्यांमध्ये पाच गुण आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात विजय झाला आणि भारत झिम्बाब्वेविरुद्ध पराभूत झाला तर दक्षिण आफ्रिका सात गुणांसहीत अव्वल स्थानी असेल. तर भारत दुसऱ्या स्थानावर राहून पात्र ठरेल. मात्र आता भारत दुसऱ्या स्थानी राहिल्यास त्यांना न्यूझीलंडविरुद्ध उपांत्यफेरी खेळावी लागेल. तर अव्वल स्थानी राहिल्यास भारत पहिल्या गटात दुसऱ्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडविरोधात मैदानात उतरेल.